मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – फॉरेस्ट विभागात नोकरीच्या आमिषाने फसवणुक करुन एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग झाल्याचा प्रकार चेंबूर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी धनंजय सतोष पाटील या आरोपीविरुद्ध नेहरुनगर पोलिसांनी फसवणुकीसह विनयभंग आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. धनंजय हा जळगावच्या पाचोरा, मोहाडीचा रहिवाशी असून त्याला लवकरच या गुन्ह्यांत अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
१७ वर्षांची तक्रारदार मुलगी ही चेंबूर परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहत असून ती घरकाम करते. ऑगस्ट महिन्यांत तिची धनंजयशी ओळख झाली होती. त्याने त्याची फॉरेस्ट विभागात ओळख असून काही अधिकारी त्याच्या परिचित आहेत. त्यांच्या मदतीने तिच्यासह तिच्या भावाला फॉरेस्ट विभागात नोकरी लावण्याचे आश्वासन दिले होते. याच नोकरीसाठी त्याने तिच्याकडून ऑगस्ट ते ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत सात लाख रुपये घेतले होते. त्यापैकी ऑनलाईन २ लाख ६० हजार तर ४ लाख ४० हजार कॅश स्वरुपात घेण्यात आले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने तिच्यासह तिच्या भावाला नोकरी मिळवून दिली नाही. त्याच्याकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच तिने त्याच्याकडे नोकरीसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने पैसे न देता त्यांची फसवणुक केली होती. याच दरम्यान त्याने तिला मागून मिठी मारुन तिच्या छातीला नकोसा स्पर्श केला, अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. त्यानंतर तो पळून गेला होता.
हा प्रकार तिने तिच्या आईसह भावाला सांगितला होता. त्यानंतर त्यांनी त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सोमवारी ४ नोव्हेंबरला तिने त्याच्याविरुद् नेहरुनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर धनंजय पाटील याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह फसवणुक आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.