सोळा लाखांच्या फसवणुकीप्रकरणी मंत्रालयीन कर्मचार्याविरुद्ध गुन्हा
लोहखनिज डंपची उचल करण्याचा परवाना देतो असे सांगून फसवणुक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ जुलै २०२४
मुंबई, – मंत्रालयातून लोहखनिज डंपची उचल करण्याचा परवाना मिळवनू देतो असे सांगून एका नर्स महिलेची सुमारे सोळा लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मंत्रालयीन कर्मचारी असलेल्या रमेश सिताराम महाडेश्वर याच्याविरुद्ध मरिनड्राईव्ह पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. रमेशला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे.
अजिजाबी शकुर शेख ही ४१ वर्षांची मूळची सिंधुदुर्गच्या सावंतवाडी, खाजकील वाड्यातील रहिवाशी आहे. सावंतवाडीच्या भाईसाहेब सावंत आयुवैदिक शासकीय हॉस्पिटलमध्ये ती नर्स म्हणून कामाला आहे. सप्टेंबर २०१५ रोजी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मंत्रालयातील कर्मचारी रमेश महाडेश्वर हे ऑडिटसाठी आले होते. यावेळी त्यांची ओळख झाली होती. ते दोघेही एकाच गावचे रहिवाशी असल्याने ती मंत्रालयात गेल्यानंतर त्यांना भेटत होती. सप्टेंबर २०१६ रोजी ती कामानिमित्त मंत्रालयात आली होती. यावेळी तिची रमेशसोबत भेट झाली होती. त्याने तिला त्याचे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्यांशी त्याची चांगली ओळख आहे. सिधुदुर्ग येथे लोहखनीज डंपची उचल करण्याचा तिला परवाना मिळवून देतो असे सांगितले. हा परवाना मिळाल्यास तिला चांगला फायदा होईल असे सांगून तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांच्यात परवाना मिळवून देण्यासाठी सोळा लाख रुपये देण्याचे ठरले होते. तिनेही त्यास होकार दिला होता. ठरल्याप्रमाणे तिने पैशांची जमवाजमव करुन तसेच बँकेतून कर्ज काढून रमेश महाडेश्वरला सोळा लाख रुपये दिले होते. ही रक्कम त्याच्यासह त्याच्या मुलाच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती.
मात्र काही महिने उलटून गेल्यानंतर त्याने तिला लोहखनिज डंपची उचल करण्याचा परवाना मिळवून दिला नाही. त्यामुळे तिने त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. सतत पैशांची मागणी होत असल्याने रमेशने तिला काही धनादेश दिले होते, मात्र ते धनादेश बँकेत न वटता परत आले होते. याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने तिला पैसे देण्याचे आश्वासन दिले. मात्र पाच ते सहा वर्ष उलटूनही त्याने सोळा लाख रुपये परत केले नाही. रमेशकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तिने मरिनड्राईव्ह पोलिसत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रमेश महाडेश्वरविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत लवकरच त्याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.