प्रेयसीच्या बदनामीनंतर पळालेल्या प्रियकराला अटक
खाजगी व्हिडीओ व फोटो व्हायरल करुन बदनामी केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ जुलै २०२४
मुंबई, – प्रेयसीच्या बदनामीनंतर मुंबईतून कर्नाटकला पळून गेलेल्या प्रियकराला अटक करण्यात अखेर आझाद मैदान पोलिसांना यश आले आहे. तौहिद जमीर शरीफ असे या २२ वर्षीय प्रियकराचे नाव असून अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तौहिदवर त्याच्या प्रेयसीसोबत खाजगी अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करुन बदनामी केल्याचा आरोप असून गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता.
२० वर्षांची तक्रारदार तरुणी गेल्या दोन वर्षांपासून मरिनड्राईव्हच्या चंदनवाडी परिसरात राहते. तिच्यासोबत तिचे आजी आणि काका राहतात. संबंधित कुटुंबिय मूळचे कर्नाटकच्या म्हैसूरचे रहिवाशी असून तिचे आई-वडिल तिथेच राहत होते. याच परिसरात राहणार्या तौहीफ हा तिचा परिचित असून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र त्यांच्या प्रेमसंबंधाला तिच्या आई-वडिलांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी तिला पुढील शिक्षणासाठी मुंबईत पाठवून दिले होते. ती सध्या चर्नीरोडच्या एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. या शिक्षणासोबत ती एअरहॉस्टेसचा कोर्स करत आहे. जानेवारी २०२४ रोजी तिचे तौहीदसोबत संमतीने शारीरिक संबंध आले होते. त्यावेळी त्याने त्याच्या मोबाईलमध्ये त्यांचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढले होते. १९ जून २०२४ रोजी ती अंधेरी येथून क्लास संपल्यानंतर घरी जात होती. यावेळी तिथे तौहीद आला आणि त्याने तिच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्याने तिला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर तो पळून गेला होता. हा प्रकार तिने तिच्या काकांना फोनवरुन सांगितला. त्यानंतर त्यांनी आझाद मैदान पोलिसांत तौहीदविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्यांची तर त्यांच्या वडिलांनी त्याच्याविरुद्ध म्हैसूरच्या एनआर पोलिसांतही तक्रार केली होती.
याच दरम्यान तौहीदने सोशल मिडीयावर तिच्या आईसह काकांना त्यांच्यातील शारीरिक संबंधाचे व्हिडीओ आणि फोटो पाठवून तिची बदनामीचा प्रयत्न केला. ते व्हिडीओ आणि फोटो पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला होता. घडलेल्या घटनेची त्यांनी तिच्याकडे विचारणा केली असता तिने त्याच्यासोबत तिचे शारीरिक संबंध आल्याची कबुली दिली. मात्र त्यांच्यातील खाजगी व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करुन त्याने तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिने तौहीदविरुद्ध आझाद मैदान पोलिसांत तक्रार केली होती. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ७५ (१), (३), ७७ भारतीय दंड संहिता सहकलम ६६ (ई), ६७, ६७ (अ) आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तौहिद हा पळून गेला होता. तो कर्नाटक येथील गावी गेल्याची माहिती प्राप्त होताच आझाद मैदान पोलिसांची एक टिम तिथे पाठविण्यात आली होती. या पथकाने त्याला शुक्रवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला ट्रॉन्झिंट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याने मोबाईलमधील फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले असून मोबाईल कुठेतरी लपवून ठेवला आहे. त्यामुळे हा मोबाईल शोधून काढणे, त्यातील फोटो आणि व्हिडीओ परत मिळविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे. ते दोघेही स्नॅप चॅट आणि पबजी या ऍपच्या माध्यातून संपर्कात होते. त्यांच्यातील चॅटींगची माहिती काढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.