चांदीच्या गुंतवणुकीवर दुप्पट फायदा देण्याच्या आमिषाने व्यापार्‍यांना गंडा

८२ लाखांच्या १६५ किलो चांदीच्या अपहारप्रकरणी आरोपीस अटक

0

अरुण सावरटकर
२४ जून २०२६
मुंबई, – चांदीच्या गुंतवणुकीवर दुप्पट फायदा देण्याच्या आमिषाने चांदी व्यापार्‍यांना गंडा घातल्याप्रकरणी एका वॉण्टेड आरोपीस चारकोप पोलिसांनी अटक केली. दर्शन हरिश सोलंकी असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत सुरेश दलाराम सेन आणि मदन दलाराम सेन या दोन बंधूंचा सहभाग उघडकीस आले असून या तिघांनी संगनमत करुन गुंतवणुकीच्या नावाने दोन्ही व्यापार्‍यांची सुमारे ८२ लाखांच्या १६५ किलो चांदीचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जात असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

मेहुल हिम्मतलाल जोशी हे कांदिवलीतील चारकोप परिसरात राहत असून त्यांचा चांदीचा व्यवसाय आहे. गेल्या अठरा वर्षांपासून ते चांदीची शिट बनवून देवांच्या मूर्त्या बनविण्याचे काम करतात. याकामी त्यांना त्यांचा मित्र मुकेश गोवर्धनदास रावल हा मदत करतो. सुरेश सेन हा मुकेशचा परिचित असून त्यांच्यात व्यावसायिक संबंध होते. बोरिवलीतील रहिवाशी असलेल्या सुरेशचा चांदीचा व्यवसाय होता. त्यातून त्यांची सुरेशसोबत ओळख झाली होती. सुरेशला चांदीच्या व्यवसायात मोठी गुंतवणुक करायची होती. जुलै २०१९ रोजी त्याने मेहुल आणि मुकेश यांना त्याच्या घरी बोलाविले होते. त्याने त्याच्याकडे काही महिन्यांसाठी चांदी गुंतवणुकीचा सल्ला देताना या गुंतवणुकीवर त्यांना दुप्पट फायदा मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले होते.

या गुंतवणुकीवर त्याच्यासह इतर चांदी व्यापार्‍यांना चांगला फायदा होणार असल्याचे चित्र त्याने निर्माण झाले होते. त्यामुळे त्याच्या आमिषाला बळी पडून मेहुल जोशी आणि मुकेश रावल यांनी सुरेश सेनकडे टप्याटप्याने ८२ लाख ३६ हजार ५०० रुपयांची १६५ किलो ३५० ग्रॅम वजनाची चांदीची गुंतवणुक केली होती. याकामी सुरेशला मदन सेन आणि दर्शन सोलंकी यांनी मदत केली होती. मात्र सहा महिन्यानंतर त्यांनी त्यांना दुप्पट चांदी किंवा चांदीचे पेमेंट दिले नाही. कोरोनाचे कारण पुढे त्याने त्यांना दोन वर्ष थांबण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांनी दोन वर्ष त्यांच्याकडे पैशांची मागणी केली नाही.

दोन वर्षांनंतर त्यांनी त्यांच्या पैशांची मागणी केली असता ते तिघेही त्यांना वेगवेगळे कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. सप्टेंबर २०२५ रोजी मेहुल जोशी हे सुरेश सेनच्या बेारिवलीतील राहत्या घरी गेले होते. यावेळी त्यांनी त्याच्याकडे गुंतवणुकीसाठी दिलेल्या चांदीची मागणी केल्यानंतर त्याने त्यांना चांदी देण्यास नकार दिला. सर्व चांदी त्याचा भाऊ मदनकडे असून हिम्मत असेल तर त्याच्याकडून चांदी वसुल करुन दाखवा. माझे उत्तरप्रदेशातील संघटित टोळीतील काही गुंडांशी चांगली ओळख आहे. तुम्हाला पैसे आणि चांदी मागणे फार महागात जाईल. त्यामुळे चांदी विसरुन जा किंवा पैशांसाठी कॉल करुन विचारणा करु नका असे सांगून त्याच्या कमरेला लावलेल्या पिस्तूलचा धाक दाखवून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती.

यावेळी सुरेशसोबत त्याचा जावई दर्शन सोलंकी हा तिथे उपस्थित होता. या प्रकारानंतर मेहुल जोशी हे प्रचंड घाबरले होते. जिवाच्या भीतीने ते तेथून निघून गेले होते. घडलेला प्रकार मेहुल जोशी यांनी चारकोप पोलिसांना सांगून सुरेश सेन, मदन सेन आणि दर्शन सोलंकी यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी ८२ लाखांच्या १६५ किलो चांदीचा अपहार करुन तक्रारदारासह त्यांच्या व्यापारी मित्राची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ते तिघेही पळून गेले होते. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेल्या दर्शन सोलंकी याला सोमवारी पोलिसांनी अटक केली.

तपासात दर्शन हा या कटातील मुख्य आरोपी सुरेश सेनचा जावई आहे. त्याने सुरेश सेनला गुन्ह्यांत मदत केली होती, तसेच धमकीच्या वेळेस तो त्याच्या बोरिवलीतील राहत्या घरी होती. त्याच्यासमोरच सुरेशने मेहुल जोशी यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही लोकांना चांदी गुंतवणुकीवर दुप्पट रक्कमेचे आमिष दाखवून गंडा घातला आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page