वैद्यकीय उपकरणे-मशिनरीसाठी घेतलेल्या कर्जाचा अपहार
४७ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी वॉण्टेड असलेल्या महिलेस अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – वैद्यकीय उपकरणे आणि मशिनरीसाठी घेतलेल्या सुमारे ४७ लाख रुपयांचा कर्जाचा अपहार करुन कॅपसेव फायनान्स कंपनीची फसवणुक केल्याच्या कटात वॉण्टेड असलेल्या एका महिलेस वनराई पोलिसांनी अटक केली. सलिना मियदूल खातूम शेख असे या महिलेचे नाव असून फसवुणकीच्या याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्यांत तिच्यासोबत मोयदूल शेख आणि देबाशिष चॅटर्जी हे दोघेही सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सागितले.
चिराग हसमुख खत्री हे गोरेगाव येथील कॅपसेव फायनान्स कंपनीत उपाध्याक्ष म्हणून काम करतात. ही कंपनी लघु उद्योगासह वैद्यकीय उपकरणे आणि मशिनरीसाठी अर्थपुरवठा करते. ज्या लोकांनी कंपनीकडे कर्ज घेतले आहे, मात्र या कर्जाची परतफेड केली नाही, अशा डिफोल्टर यादीत समावेश असलेल्या लोकांकडे पाठपुरावा करुन पॅनेलवरील वकिलामार्फत त्यांना कायदेशीर नोटीस पाठवून किंवा संबंधित पोलिसांत कायदेशीर प्रकिया करण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. दोन वर्षांपूर्वी जुलै महिन्यांत खानम नर्सिंगचे मौयदुल शेख आणि बीडीएस सिस्टमचे देबाशिष चॅटजीसह इतरांनी त्यांच्या कंपनीकडे वैद्यकीय उपकरणे आणि मशिनरीसाठी कर्जासाठी अर्ज केला होता. या कंपनीने पाठविलेल्या वैद्यकीय उपकरणे-मशिनरीची छाननी केल्यानंतर कंपनीने दोन्ही कंपन्यांना ९० लाख ७४ हजारापैकी ५९ लाख ८४ हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले होते.
कर्जाची ही रक्कम नंतर खानम नर्सिंग आणि बीडीएस सिस्टीम या कंपनीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती. कर्जाचे वाटप केल्यानंतर काही महिन्यांनंतर मशिनरी आणि वैद्यकीय उपकरणाची माहिती जाणून घेण्यासाठी दोन्ही ठिकाणी कंपनीच्या एका प्रतिनिधीला पाठविण्यात आले होते. मात्र तिथे गेल्यानंतर या दोन्ही कंपनीने वैद्यकीय उपकरणे आणि मशिनरी खरेदी केली नसल्याचे उघडकीस आले. याबाबत विचारणा केल्यानंतर कंपनीला अद्याप ते उपकरणे आणि मशिनरी डिलीव्हरी झाले नसल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार संशयास्पद वाटताच कंपनीने त्याची चौकशी सुरु केली होती.
या चौकशीत या दोन्ही कंपनीच्या प्रमुख मोयदूल शेख, सलिना खालूम आणि देबाशिष चॅटर्जी यांनी इतर आरोपींच्या मदतीने कॅपसेव फायानान्स कंपनीकडून वैद्यकीय उपकरणे आणि मशिनरीसाठी कर्ज घेऊन प्रत्यक्षात मशिनरी-उपकरणे खरेदी न करता कर्जाच्या पैशांचा अपहार केल्याचे दिसून आले होते. कर्जाची परतफेड करताना त्यांनी काही रक्कम जमा केली होती. मात्र ४९ लाख ७० हजाराचा अपहार करुन कंपनीची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच कंपनीच्या वतीने चिराग खत्री यांनी वनराई पोलिसांत तिन्ही आरोपीसह इतराविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मोयदूल शेख, सलिना देबाशिष चॅटर्जी यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.
गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपी पळून गेले होते. या तिघांचा पोलिसाकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या सात महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या सलिना खातूम या महिलेस पोलिसांनी अटक केली. चौकशीत तिने तिच्या इतर सहकार्यांच्या मदतीने ही फसवणुक केल्याची कबुली दिली आहे. अटकेनंतर तिला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.