मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ जानेवारी २०२५
मुंबई, – छोटा राजन टोळीशी संबंधित असलेल्या एका रेकॉर्डवरील आरोपीस देवनार पोलिसांनी अटक केली. राजू विकन्या ऊर्फ विलास बालाराम पवार असे या आरोपीचे नाव आहे. हत्येच्या प्रयत्नासह आर्म्स ऍक्टच्या गुन्ह्यांत जामिनावर बाहेर आल्यानंतर विलासविरुद्ध विशेष सेशन कोर्टाने आजामिनपात्र वॉरंट जारी केले होते. या वॉरंटनंतर त्याचा शोध सुरु असताना त्याला ३२ वर्षांनी फेरअटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर त्याला पुन्हा विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.
विलास पवार हा चेंबूर येथील घाटला गाव, महादेव शेठ वाडीतील रहिवाशी असून तो छोटा राजन टोळीचा अत्यंत जवळचा सहकारी म्हणून गुन्हेगारी जगतात परिचित होता. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यात गोवंडी आणि दादर येथे झालेल्या फायरिंगचा समावेश होता. १९९२ साली गोवंडीतील देवनार परिसरात एका व्यक्तीवर काही अज्ञात व्यक्तींनी हत्येच्या उद्देशाने गोळीबार केला होता. या गोळीबारात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी देवनार पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह आर्म्स ऍक्टप्रमाणे गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना विलास पवार याला पोलिसांनी अटक केली.
चौकशीत त्याच्यासह इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला होता. याच गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडीत असताना त्याने त्याच्या वकिलांच्या मदतीने विशेष सेशन कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी दिल्यानंतर त्याला जामिनावर सोडून देण्यात आले होते. मात्र खटल्याच्या सुनावणीसाठी विलास हा सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध जामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. याच गुन्ह्यांत तो ३२ वर्षांपासून वॉण्टेड होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असातानाच त्याला पोलिसांनी ३२ वर्षानंतर अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.