मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० मार्च २०२४
मुंबई, – सिडकोच्या फ्लॅटसाठी एका ६५ वर्षांच्या वयोवृद्धाची फसवणुक केल्याप्रकरणी महेश गोपाळ सुर्वे या प्रॉपटी एजंटला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. स्वस्तात फ्लॅट देतो असे सांगून महेशने २७ लाख २५ हजार रुपये घेऊन साडेअकरा लाख रुपये परत करुन सुमारे सोळा लाखांचा अपहार केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.
सुरेश महादेव मासये हे त्यांच्या कुटुंबियांसोबत नवी मुंबईतील जुईनगर परिसरात राहतात. ते नायर हॉस्पिटलमधून वॉर्ड मॅनेजमेंटमधून निवृत्त झाले आहेत. सध्या ते त्यांच्या कुटुंबियांसोबत भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतात. निवृत्तीनंतर त्यांना काही पैसे मिळाले होते, त्यातून त्यांना स्वतचे घर घ्यायचे होते. घरासाठी प्रयत्न सुरु असताना तयांच ओळख महेश सुर्वेशी झाली होती. त्याच्या एका परिचित नातेवाईकाला नवी मुंबईतील सिडकोच्या फ्लॅटची ४५ लाखांना विक्री करायची होती. हा फ्लॅट त्यांना ४० लाखांमध्ये मिळवून देतो असे सांगून त्याने त्यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे ते महेशसोबत नवी मुंबईतील सेक्टर ४४, सनसिटी अपार्टमेंटच्या तिसर्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ३०२ पाहण्यासाठी गेले होते. त्यांना तो फ्लॅट आवडला होता, त्यामुळे त्यांनी त्यांच्या कुटुंबियांसाठी तोच फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्यातील झालेल्या चर्चेनंतर सुरेश मासये यांनी महेशला २७ लाख २५ हजार रुपये दिले. उर्वरित पेमेंट फ्लॅटचा ताबा तसेच कागदपत्रे दिल्यानंतर देण्याचे ठरले होते. मात्र वारंवार विचारणा करुन महेश त्यांना फ्लॅटचे कागदपत्रे देत नव्हता. त्यामुळे त्यांनी फ्लॅट मालकाला संपर्क साधून त्यांच्याकडे फ्लॅटच्या कागदपत्रांची मागणी केली होती, मात्र त्यांनी त्यांना कागदपत्रे देण्यास नकार दिला. महेशकडून त्यांना अद्याप पेमेंट मिळाले नाही. पेमेंट दिल्याशिवाय कागदपत्रै देणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली होती.
या प्रकाराने त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी महेशकडे विचारणा केली असता त्याने तुमचे पैसे मी वापरले असून त्याच्याकडे आता पैसे नाही. लॉकडाऊन सुरु आहे. तुमचे पैसे नंतर देतो असे सांगून त्यांचा फोन बंद केला. सतत पैशांची मागणी करुनही तो पैसे परत करत नव्हता. त्याने दिलेल्या सोळा लाखांचा धनादेशही बँकेत न वटता परत आला होता. खूप विनंती केल्यानंतर त्याने त्यांना साडेअकरा लाख रुपये परत केले, मात्र पावणेसोळा लाखांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केल होती. त्यामुळे त्यांनी गोरेगाव पोलिसात त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी महेश सुर्वेविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. त्याचा शोध सुरु असताना त्याला दिड महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.