मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३१ मार्च २०२४
मुंबई, – पोटातून कोकेन घेऊन आलेल्या एका विदेशी नागरिकाला छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तवार्ता संचलनालयाच्या अधिकार्यांनी अटक केली. जे. जे रुग्णालयात दाखल केलेल्या या विदेशी नागरिकाच्या पोटातून अकरा कोटीचे कोकेन असलेले कॅप्सूल या अधिकार्यांनी हस्तगत केले आहेत. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे सांगण्यात आले.
विदेशात मोठ्या प्रमाणात कोकेनची तस्करी होणार असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्यांनी विदेशातून येणार्या प्रत्येक प्रवाशांसह त्यांच्या सामानाची झडती घेण्यास सुरुवात केली होती. २८ मार्चला सिएरा लिओन येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाला चौकशीसाठ ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्याने पोटातून कोकेन आणल्याची कबुली दिली होती. त्यामुळे त्याला लोकल कोर्टात हजर करुन कोर्टाच्या आदेशावरुन जे. जे. रुग्णालयात दाखल करणयात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याच्या पोटात एक्सरे काढला होता. यावेळी त्याने कॅप्सुलमधून कोकेन आणल्याचे उघडकीस आले. ३० मार्चला त्याच्या पोटातून पोलिसांनी कॅप्सूल काढून ११०८ ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत सुमारे ११ कोटी रुपये इतकी आहे. कोकेन तस्करीप्रकरणी नंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन या अधिकार्यांनी त्याला अटक केली. कोकेन तस्करीच्या मोबदल्यात त्याला काही रक्कमेचे कमिशन मिळणार होते. मात्र कोकेनची डिलीव्हरी करण्यापूर्वीच त्याला या अधिकार्यांनी अटक केली. ते कोकेन तो कोणाला देणार होता याचा संबंधित अधिकारी तपास करत आहेत.