विविध बतावणी करुन फसवणुक करणार्या टोळीचा पर्दाफाश
परभणीच्या तीन भामट्यांना अटक; अनेक गुन्ह्यांची नोंद
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – सोन्याचे चिप्स, साडी वाटप सुरु आहे. शेठला मुलगा झाला असून मोफत रेशन वाटप सुरु आहे, पुढे नाकाबंदी सुरु आहे तसेच पोलीस असल्याची बतावणी करुन रस्त्यावरुन जाणार्या नागरिकांना विशेषता वयोवृद्धांची फसवणुक करणार्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी परभणीच्या तीन ठगांना पोलिसांनी अटक केली असून या तिघांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात अनेक फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्या अटकेने नऊ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. शैेलेश दशरथ पवार, प्रकाश लहुजी काळे आणि समीर नसीर बेग अशी या तिघांची नावे असून अटकेनंतर या तिघांनाही पुढील चौकशीसाठी शाहूनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांनी सांगितले.
कमला चंद्रप्पा नंदपल्ली ही ७० वर्षांची वयोवृद्ध महिला धारावी परिसरात राहते. तिला बोलता आणि ऐकू येत नसून इशार्यावरुन ती सांगते. २४ सप्टेंबरला तिची वयोवृद्ध बहिण बाथरुममध्ये पडली होती. त्यामुळे ती मेडीकलमध्ये गरम पाण्याची पिशवी घेण्यासाठी गेली होती. यावेळी तिला दोन तरुण भेटले. त्यांनी तिला शाहूनगर येथील फायर बिग्रेडजवळील मनपा रुग्णालयाजवळ सोन्याचे चिप्सचे वाटप होत आहे. तिचा तिने फायदा घ्यावा असे सांगून त्याने तिला सोबत तिथे नेले. काही अंतर गेल्यानंतर त्यांनी तिला झाडाजवळ बसविले. तिला चार बिस्कीटचे पुडे आणि दोन चिप्सचे पॅकेट आणून दिदले. तिला सोन्याचे चिप्स आणून देतो असे सांगून त्यांनी हातचलाखीने अंगावरील सोन्याची चैन आणि अंगठी असा सत्तर हजाराचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते.
हा प्रकार लक्षात येताच तिने शाहूनगर पोलिसांना ही माहिती दिली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा शाहूनगर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत होते. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन अशाच गुन्ह्यांच्या उद्देशाने काही आरोपी घाटकोपर परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस शिपाई होनमाने यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी प्रभारी आत्माजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक साठे, पोलीस उपनिरीक्षक शेलार, पोलीस हवालदार पवार, गुरव, मोरे, जोशी, बल्लाळ, गलांडे, जाधव, पोलीस शिपाई होनमाने यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. गुरुवारी तिथे शैलेश पवार, प्रकाश काळे आणि समीर बेग आले होते. त्यांची हालचाल संशयास्पद वाटताच तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्यांनी तक्रारदार महिलेची फसवणुक केल्याची कबुली दिली. चौकशीत ही टोळी विविध कारणासह आमिष दाखवून रस्त्यावरुन जाणार्या नागरिकांना विशेषता वयोवृद्धांची फसवणुक करत असल्याचे उघडकीस आले. त्यांच्या अटकेने मुंबईतील शाहूनगर, दिडोंशी, कांदिवली, निर्मलनगर, खार, नालासोपारा येथील आचोले, कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्यातील नऊ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. शैलेश हा या टोळीचा म्होरक्या असून त्याच्याविरुद्ध वनराई, नेहरुनगर, चारकोप, मानखुर्द, चेंबूर, टिळकनगर पोलीस ठाण्यात आठ तर प्रकाश काळेविरुद्ध धारावी आणि भाईंदर पोलीस ठाण्यात दोन फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे.
तिन्ही आरोपी मूळचे परभणीचे रहिवाशी असून गुन्हा करण्यासाठी ते परभणीतून मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण परिसरात येत होते. गुन्हा केल्यानंतर पुन्हा त्यांच्या गावी जात होते. अटकेनंतर या तिघांनाही पुढील चौकशीसाठी शाहूनगर पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर तिन्ही आरोपींना शुक्रवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांच्याकडून लवकरच चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.