बोलण्यात गुंतवून दागिने पळविणार्‍या मुठ्ठा टोळीच्या म्होरक्याला अटक

चार गुन्ह्यांची उकल करुन शंभर टक्के चोरीचा मुद्देमाल जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – बोलण्यात गुंतवून रस्त्यावरुन जाणार्‍या पादचार्‍यांना विशेषता वयोवृद्धासह महिलांच्या अंगावरील दागिने चोरी करुन पळून जाणार्‍या मुठ्ठा टोळीच्या एका म्होरक्याला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. राहुल कन्हैय्या सोलंकी असे या 30 वर्षीय आरोपीचे नाव असून तो फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या अटकेने मुंबईसह ठाण्यातील चार फसवणुकीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून या गुन्ह्यांतील शंभर टक्के चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

यातील तक्रारदार महिला ही नवी मुंबईत राहत असून चेंबूर परिसरात हाऊसकिपिंगचे काम करते. 25 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी पावणेदोन वाजता ती दुकानात सामान आणण्यासाठी गेली होती. यावेळी बाईकवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी तिला बोलण्यात गुंतवून, त्यांच्याकडील निळ्या रंगाच्या रुमालात बांधलेल्या पैशांचे बंडल देत तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र घेऊन पलायन केले होते. हा प्रकार लक्षात येताच तिने चेंबूर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.

गेल्या काही महिन्यांत अशा गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढल्याने त्याची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला संमातर तपास करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर गुन्हे शाखेने अशा गुन्ह्यांतील आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना राहुल सोलंकी याला पोलीस निरीक्षक सुशांत सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर धुतराज, श्रीकांत काळे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चौधरी, पोलीस उपनिरीक्षक संदीप रहाणे, बेळणेकर, महिला पोलीस उपनिरीक्षक माशेरे, सहाय्यक फौजदार देसाई, पारकर, पोलीस हवालदार चव्हाण, तुपे, डगळे, वानखेडे, गर्जे, शिरसाट, शिंदे, गायकवाड, बैलकर, भालेराव, खेडकर, पांचाळ, शेख, पोलीस शिपाई शिर्के, बागल, ससाणे, बोढारे, महिला शिपाई सरोदे, सुतार, पोलीस हवालदार चालक डाळे, कदम, जायभाये यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशीत राहुल हा मुठ्ठा काम करणार्‍या टोळीचा मुख्य आरोपी असल्याचे उघडकीस आले. तो सध्या कल्याणच्या हाजीमलंग, द्वारलीपाडा परिसरात राहतो. त्याने बोलबच्चन करुन रस्त्यावरुन जाणार्‍या पादचार्‍यांना विशेषता वयोवृद्धासह महिलांना टार्गेट करुन त्यांच्याकडील दागिने पळविल्याची कबुली दिली. अशा प्रकारे चोरी करणारी ही एक टोळी असून या टोळीचा राहुल हा म्होरक्या आहे. त्याच्याविरुद्ध मुंबईसह ठाणे, ठाणे ग्रामीणमधील विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध भिवंडी, बदलापूर आणि कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहे.

त्याच्या चौकशीतून चार गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यात चेंबूर, पंतनगर, कांजूरमार्ग आणि कळवा पोलीस ठाण्यातील चार फसवणुकीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. या चारही गुन्ह्यांतील शंभर टक्के चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याच्या चौकशीतून अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page