फ्लॅटच्या आमिषाने नौसेनेच्या क्लार्क महिलेची फसवणुक
इंडिया बुल्स कंपनीच्या मॅनेजर महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – फ्लॅटच्या आमिषाने भारतीय नौसेनेत क्लार्क म्हणून काम करणार्या एका अधिकारी महिलेची साडेपंधरा लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी इंडिया बुल्स फायानान्स कंपनीत मॅनेजर म्हणून काम करणार्या निलम तुकाराम जाधव या महिलेविरुद्ध दादर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत तिची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. तिने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहे का याचा पोलिसाकडून तपास सुरु आहे.
निलम राजेश लांडगे ही महिला कांजूरमार्गच्या नेव्हल सिव्हीलियन हाऊसिंग कॉलनीत तिच्या कुटुंबियांसोबत राहते. ती भारतीय नौसेनेत अप्पर डिविजनल क्लार्क तर तिचे पती राजेश हे अंधेरीतील साकिनाका परिसरातील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. 2018 साली ती घाटकोपर शाखेत कार्यरत होती, यावेळी तिच्यासोबत क्लार्क म्हणून काम करणार्या तृप्ती सुर्वे हिने तिची नातेवाईक असलेली निलम जाधवशी ओळख करुन दिली होती. निलम ही इंडिया बुल्स या फायानान्स कंपनीत कामाला असल्याचे सांगून ती नवीन फ्लॅट खरेदीचे बुकींग घेत असल्याचे सांगितले होते.
निलम जाधव ही तिची आतेबहिण असल्याने तिने तिच्या कंपनीच्या प्रोजेक्टमध्ये एक फ्लॅटमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ती तिच्या एलफिस्टन मिल, सेनापती बापट मार्गावरील इंडिया बुल्स फायानान्स सेंटर टॉवरच्या कार्यालयात फ्लॅटबाबत चर्चा करण्यासाठी गेली होती. तिथे गेल्यानंतर तिला निलम जाधव ही तिथे मॅनेजर म्हणून काम करत असल्याचे सांगितले. तिने तिला तिच्या प्रोजेक्टच्या फ्लॅटबाबत माहिती सांगून तिला बुकींग रक्कम भरण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे तिने बुकींग रक्कम भरुन तिच्याकडून कंपनीच्या लेटरहेडवर पैसे भरल्याची पावती घेतली होती.
याच दरम्यान तिने तिला टिळकनगर येथील त्रिवेणी प्रोजेक्टमध्ये अकराव्या मजल्यावरील वन बीएचके फ्लॅट दाखवून या फ्लॅटची किंमत 51 लाख रुपये असल्याचे सांगितले. त्यामुळे तिने तोच फ्लॅट बुक केला होता. या फ्लॅटसाठी तिने तिला टप्याटप्याने 15 लाख 54 हजार 350 रुपयांचे पेमेंट केले होते. या फ्लॅटचा ताबा तिला 2020 साली मिळणार होता, त्यापूर्वी कंपनीला संपूर्ण पेमेंट देण्याचे त्यांच्यात ठरले होते. मात्र कोव्हीडची साथ आल्याने दोन वर्ष त्यांच्यात कुठलाही संपर्क झाला नव्हता. नंतर निलम लांडगे हिने फ्लॅटबाबत विचारणा सुरु केली होती. यावेळी तिने बिल्डींगला अद्याप ओसी प्राप्त झाली नाही, त्यामुळे पेझेशन मिळण्यास उशीर लागेल असे सांगतले.
काही दिवसांनी ती तिच्या कार्यालयात गेली होती. यावेळी तिला इंडिया बुल्स कंपनीला अॅम्बेसी ग्रुपने टेकओव्हर केल्याचे समजले. या गु्रपने तिला राजीनामा देण्यास सांगितल्याने तिने आता राहुल यादवशी संपर्क साधावा असे सांगितले होते. यावेळी तिने तिला दुसरा फ्लॅट किंवा तिचे व्याजासहीत पैसे देण्याचे आश्वासन दिले होते, त्यामुळे तिने फ्लॅटचा व्यवहार रद्द करुन तिचे पैसे परत करण्याची विनंती केली. या विनंतीनंतर तिला कंपनीकडून 20 लाख 45 हजाराचा धनादेश पाठविण्यात आला,
मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. तपासअंती तिला तो धनादेश कंपनीचा नसून धारावी येथे राहणार्या लक्ष्मण गाडे या व्यक्तीचा असल्याचे समजले. त्यामुळे तिने निलम जाधवकडे विचारणा केली होती असता ती तिला वेगवेगळे कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होती. तिच्याकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच निलम लांडगे हिने दादर पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर निलम जाधवविरुद्ध पोलिसांनी फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून तिची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. निलमने फ्लॅटसाठी इतर काही लोकांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.