मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – मनी लॉड्रिंगसह ऑनलाईन छळवणूक, पोर्नोग्राफिक व्हिडीओ गुन्ह्यांत कारवाईची धमकी देऊन एका ७० वर्षांच्या वयोवृद्धाला अज्ञात सायबर ठगांनी सुमारे ४४ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध सायबर सेल पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
तक्रारदार वयोवृद्ध त्यांच्या पत्नीसोबत अंधेरी परिसरात राहत असून ते एका खाजगी कंपनीत निवृत्त झाले आहे. १७ सप्टेंबरला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. या व्यक्तीने पोलीस गणवेश घातला होता. त्याने तो दिल्लीतील कोर्टातून बोलत असून त्यांच्या सिमकार्डवरुन अनेकांना अश्लील मॅसेज व व्हिडीओ पाठविण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध ऑनलाईन छळवणूकीसह पोर्नोग्राफिक व्हिडीओ पाठविल्याप्रकरणी एकूण सतरा गुन्हे दाखल झाले आहे. यावेळी त्यांनी कोणालाही अश्लील व्हिडीओ पाठविले असून त्याच्या मोबाईल क्रमांकाचा कोणीतरी गैरवापर केयाचे सांगितले. याच दरम्यान त्यांना अन्य एका व्यक्तीने फोन करुन त्यांच्या नावाने एका खाजगी बँकेत खाते उघडण्यात आले असून त्यात मनी लॉड्रिंग झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणातही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु असून त्यांचे व्हॉटअप, व्हिडीओ कॉल सर्विलंसवर आहे. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत ते हाऊस अरेस्ट असल्याचे सांगितले.
या प्रकारानंतर त्यांच्यासह त्यांची पत्नी प्रचंड घाबरले होते. ही माहिती कोणाशी शेअर करु नका. माहिती शेअर केल्यास त्यांच्यावर शासकीय गुप्ततेचा भंग केल्याप्रकरणी अन्य एका गुन्ह्यांची नोंद होईल अशी धमकी दिली होती. त्यामुळे त्यांनी त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. याच दरम्यान त्यांच्या मोबाईलवर विविध तपास यंत्रणेचे तपास सुरु असल्याचे पत्र पाठविण्यात आले होते. त्यात संबंधित विभागाच्या लोगोसह राजमुद्रा होते. त्यानंतर त्यांच्या संपत्तीची माहिती काढण्यात आली होती. त्यांना बँक खात्यातील सर्व रक्कम त्यांनी दिलेल्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी २० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२४ या कालावधीत सुमारे ४४ लाख रुपये संबंधित बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते. त्यानंतर त्यांना कुमार नावाच्या व्यक्तीने एक पत्र पाठविले होते. त्यात त्यांचा कुठल्याही गुन्ह्यांत सहभाग नसल्याचे नमूद करण्यात आले.
तसेच त्यांची रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर होईल असे सांगितले. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी ही रक्कम बँक खात्यात पाठविली नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. गेल्या काही दिवसांपासून अज्ञात सायबर ठगांकडून अशाच प्रकारे विविध गुन्ह्यांत कारवाईसह अटकेची भीती देऊन वयोवृद्धांची फसवणुक होत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे असे कॉल आल्यानंतर घाबरुन न जाता जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करावी असे आवाहन सायबर सेल पोलिसांकडून करण्यात आले आहे.