अश्लील व्हिडीओ व्हायरलची धमकी देऊन फसवणुक
पोलीस पूत्राच्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ ऑगस्ट २०२४
मुंबई, – अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मुंबई पोलीस दलातील एका पोलीस पूत्राची अज्ञात सायबर ठगाने सुमारे अडीच लाखांची फसवणुक केली. याप्रकरणी दादर पोलिसांनी अज्ञात महिलेसह तिच्या सहकार्याविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा संमातर तपास सायबर सेल पोलिसांकडून सुरु आहे.
२६ वर्षांचा तक्रारदार तरुण प्रभादेवी येथे त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. तो एका नामांकित बँकेत सिनिअर एचआर म्हणून तर त्याचे वडिल सध्या पोलीस खात्यात कामाला आहेत. गुरुवारी १५ ऑगस्टला रात्री एक वाजता त्याच्या इंटाग्रामवर किर्ती शर्मा नावाच्या एका महिलेची रिक्वेस्ट आली होती. ही रिक्वेस्ट कुठलीही शहानिशा न करता त्याने स्विकारली होती. काही वेळानंतर तिने त्याच्याकडून त्याचा व्हॉटअप क्रमांक घेतला होता. त्यानेही तिला त्याचा व्हॉटअप क्रमांक दिला होता. रात्री उशिरा त्याला किर्तीचा व्हिडीओ कॉल आला होता. त्याने तो कॉल घेतल्यानंतर त्याला समोरील एका महिलेने तिच्या अंगावर सर्व कपडे काढल्याचे दिसून आले. यावेळी तिने त्यालाही त्याचे कपडे काढण्यास प्रवृत्त केले होते. त्यांच्यातील संभाषण तिने रेकॉडिंग केले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने तिचा कॉल बंद केला होता. त्यानंतर तिने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे दिले नाहीतर त्यांच्यातील अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तिने त्याला पुन्हा एक ऑडिओ कॉल पाठविला होता. त्याने तिने दहा हजाराची मागणी करुन त्याचा व्हिडीओ डिलीट करते असे सांगितले होते.
बदनामीच्या भीतीने त्याने तिला अडीच लाख रुपये पाठविले होते. ही रक्कम पाठवूनही त्याच्याकडे सतत पैशांची मागणी होत होती. पैसे दिले नाहीतर त्याची बदनामीची धमकी देऊन त्याला ब्लॅकमेल केले जात होते. या प्रकारानंतर त्याने दादर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे अज्ञात महिलेसह तिच्या सहकार्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत संबंधित आरोपीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.