शिवीगाळ केल्याचा जाब विचारला म्हणून प्राणघातक हल्ला
एकाच कुटुुंबातील दोन वयोवृद्धांसह चौघांना अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – सतत शिवीगाळ करणार्या वयोवृद्ध महिलेला जाब विचारला म्हणून एका कुटुंबातील चारजणांनी नितेश चंद्रकांत पाटील या व्यक्तीला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण आणि नंतर तिक्ष्ण हत्याराने वार करुन हल्ला केल्याची घटना वरळी परिसरात घडली. हल्ल्यात जखमी झालेल्या नितेशवर हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच दोन वयोवृद्धासह चौघांना दादर पोलिसांनी अटक केली आहे. प्रकाश नामदेव पिंगळे, सुरेश नामदेव पिंगळे, मंदार सुरेश पिंगळे आणि मयुर सुरेश पिंगळे अशी या चौघांची नावे असून ते सर्वजण वरळीतील कोळीवाडा, गोल्फादेवी मंदिराजवळील गोल्फादेवी सोसायटीचे रहिवाशी आहेत. अटकेनंतर या चौघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने चारही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत उर्मिला प्रकाश पिंगळे या ५९ वर्षांच्या महिलेस पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून तिच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार आहे. सोमवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता वरळीतील व्ही. बी मार्ग, वरळी पोस्ट कार्यालयासमोर घडली. चंद्रकांत शामराव पाटील यांचा मच्छिमारीचा व्यवसाय असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत गोल्फादेवी सोसायटीमध्ये राहतात. त्यांच्याच शेजारी पिंगळे कुटुंबिय राहत असून दोन्ही कुटुंबिय एकमेकांच्या परिचित आहेत. सोमवारी सायंकाळी उर्मिला पिंगळे यांनी काहीही कारण नसताना चंद्रकांत यांचा मुलगा नितेशला शिवीगाळ केली होती. अनेकदा उर्मिला या शिवीगाळ करत असल्याने नितेशसह चंद्रकांत आणि त्यांची सून ऋतुजा पाटील यांनी उर्मिला यांना नेहमी शिवीगाळ का करतेस असा जाब विचारला होता. त्यातून पिंगळे आणि पाटील कुटुंबियांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. रागाच्या प्रकाश, सुरेश, मंदार आणि मयुर यांनी नितेशला लाथ्याबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्याच्या पोटाला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली होती.
रक्तबंबाळ झालेल्या नितेशला स्थानिक रहिवाशांनी तातडीने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहे. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती मिळताच दादर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पिंगळे कुटुंबातील पाचजणांविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच प्रकाश पिंगळे, सुरेश पिंगळे, मंदार पिंगळे आणि मयुर पिंगळे अशा चौघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या चौघांनाही मंंगळवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.