साडेसोळा लाखांच्या घरफोडीप्रकरणी वयोवृद्ध आरोपीस अटक
आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार; चोरीसह घरफोडीचे दहा गुन्हे दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – पाच दिवसांपूर्वी बोरिवली परिसरात झालेल्या साडेसोळा लाख रुपयांच्या घरफोडीप्रकरणी एका ६२ वर्षांच्या वयोवृद्ध आरोपीस एमएचबी पोलिसांनी अटक केली आहे. मनोज महेंद्रसिंग चितालिया असे या आरोपीचे नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात चोरीसह घरफोडीचे दहाहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्याकडून चोरीचे काही सोन्या-चांदीचे हस्तगत करण्यात आले आहे. अटकेनंतर मनोजला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
शिल्पा मनोहर पौडवाल ही महिला दहिसर येथील जयवंत सावंत रोड, डेव्हीड व्हिला इमारतीच्या फ्लॅट क्रमांक १०३/बी मध्ये राहते. रविवारी ६ ऑक्टोंबर २०२४ रोजी तिच्या राहत्या घरातील सेफ्टी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला होता. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटाच्या लॉकरमधून १७६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे, १६७० चांदीचे दागिने असा १६ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. मंगळवारी रात्री साडेआठ वाजता शिल्पा पौडवाल यांना हा प्रकार निदर्शनास आला होता. त्यामुळे तिने एमएचबी पोलिसांना तिच्या घरी घरफोडी झाल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. जवळपास २५ ते ३० सीसीटिव्ही फुटेज पाहिल्यानंतर पोलिसांनी आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. याच प्रयत्नात आरोपीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले होते. रविारी दुपारी साडेबारा वाजता एक व्यक्ती शिल्पा पौडवाल यांच्या इमारतीमध्ये प्रवेश करत होता. त्याने त्याच्या तोंडाला मास्क लावला होता. काही वेळानंतर आरोपी इमारतीवरुन बाहेर पडला आणि दहिसर रेल्वे स्थानकात आला होता. तेथून तो विरार रेल्वे स्थानकात उतरला होत.
याच दरम्यान सांताक्रुज पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई नरेंद्र हिरेमठ यांनी तो आरोपी मनोज चितालिया असल्याचे ओळखले होते. त्यानंतर पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल जायभाये, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बळवंतराव, पोलीस निरीक्षक सचिन शिंदे, किरण सुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश पाटील, पोलीस हवालदार शिंदे, खोत, सवळी, मोरे यांनी आरोपी मनोजचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना मनोजला त्याच्या विरार येथील राहत्या घरातून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक करुन बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.
तपासात ६२ वर्षांचा वयोवृद्ध मनोज हा विरार येथील अन्नपाडा, मुंशीनगरचा रहिवाशी असून तो रेकार्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध जुहू, डी. एन नगर, विलेपार्ले, समतानगर, दहिसर, सांताक्रुज पोलीस ठाण्यात चोरीसह घरफोडीच्या दहाहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. चौकशीत त्याने बोरिवली पोलीस ठाण्यात अशाच प्रकारे घरफोडी केली होती. त्यामुळे त्याचा लवकरच बोरिवली पोलिसांकडे ताबा दिला जाणार आहे. त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.