मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा खास सहकारी दानिश मर्चंट ऊर्फ दानिश चिकना याला गोवा येथून मुंबई युनिटच्या नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्यांनी अटक केली. या कारवाईत दानिशची पत्नी हेना भरत शाह, दोन सहकारी एन. गायकवाड आणि जोहेब शेख या तिघांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 1341 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधी रुपये किंमत आहे. दानिश हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया असून दाऊद इब्राहिमचा खास सहकारी आहे. दाऊदसाठी तो ड्रग्जचा संपूर्ण व्यवहार सांभाळत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्या अटकेने दाऊदच्या ड्रग्जसंबंधित अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांपासून दाऊद इब्राहिम हा इतर व्यवसायाप्रमाणे ड्रग्ज व्यवसायात सक्रिय होता. सुरुवातीला त्याचे ड्रग्जचे सर्व व्यवहार दानिश चिकना हा पाहत होता. हळूहळू दानिश हा दाऊदचा खास बनला होता, त्याने देश-विदेशात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करी केली होती. त्यांच्याविरुद्ध मुंबईसह राजस्थान आणि इतर ठिकाणी गुन्हे दाखल होताच तो पळून गेला होता. अलीकडेच पुण्यातून एनसीबीच्या मुंबई युनिटच्या अधिकार्यांनी एन गायकवाड नावाच्या एका व्यक्तीला अटक केली होती. त्याच्याकडून या अधिकार्यांनी 503 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. त्याला ते ड्रग्ज जोहेब शेख याने दिले होते,
तपासात ही माहिती उघड होताच जोहेबवर या अधिकार्यांनी कारवाई केली होती. त्याच्याकडून या अधिकार्यांनी 839 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. या दोघांच्या चौकशीनंतर दानिश चिकनाचे नाव समोर आले होते. ते दोघेही दानिशसाठी ड्रग्जची विक्री करत होते. मात्र दानिशबाबत त्यांना काहीच माहिती नव्हती. तो त्यांच्यासोबत मोबाईलवर संपर्कात होता. त्याच्या आदेशावरुन ते ड्रग्जची डिलीव्हरी करत होते. त्यामुळे दानिशच्या अटकेसाठी या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना दानिश हा त्याची पत्नी हेनासोबत गोवा येथे पिकनिकसाठी गेल्याची माहिती या अधिकार्यांना मिळाली होती.
या माहितीनंतर या पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी गोव्यातील एका पॉश हॉलिडे रिसॉर्टमध्ये वास्तव्यास असलेल्या दानिश चिकना व त्याची पत्नी हेना शाह या दोघांना या अधिकार्यांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत हेना ही दानिशसोबत ड्रग्ज व्यवसायात सक्रिय होती, ती त्याची पार्टनर म्हणून काम पाहत होती. मुंबई पोलिसांसह एनसीबीच्या रडावर येताच ते दोघेही पळून गेले होते. गेल्या काही महिन्यांपासून ते दोघेही वेगवेगळ्या राज्यात वास्तव्यास होते. अटकेच्या भीतीने ते एकाच ठिकाणी जास्त वेळ राहत नव्हते. सतत मोबाईल आणि वाहन बदलत होते. दानिश चिकना हा पूर्वी दाऊद टोळीसाठी काम करत होता.
कुख्यात गुंड म्हणून परिचित असलेला दानिश नंतर दाऊदचा खास सहकारी बनला होता. डोंगरी येथे राहत असताना तो दाऊद टोळीसाठी ड्रग्जचे लहानसहान डिल करु लागला. त्यात त्याला चांगले यश मिळाले होते. त्यानंतर दाऊदने त्याच्यावर ड्रग्जच्या संपूर्ण व्यवहाराची जबाबदारी सोपविली होती. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मुंबईसह राजस्थान व इतर ठिकाणी अनेक गुन्हे दाखल आहेत. 2021 रोजी त्याच्यावर गांजा तस्करीप्रकरणी एनसीबीने कारवाई केली होती. याच दरम्यान त्याच्याविरुद्ध राजस्थान येथे एका ड्रग्जच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. गेल्या वर्षी दानिशविरुद्ध ड्रग्जच्या विक्रीसह साठवणूक करण्यात सक्रिय असल्याचा ठपका ठेवून आणखीन एका गुन्ह्यांची नोंद केली होती.
मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध सातहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या वाढत्या कारवायाची गंभीर दखल घेत त्याच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी तडीपारची कारवाई केली होती. ड्रग्जच्या गुन्ह्यांत त्याचा सहभागासह अटकेची माहिती मिळताच दानिश हा गेल्या काही वर्षांपासून सतत पोलिसांना गुंगारा देत होता. पडद्यामागून तो आपल्या सहकार्यांच्या मदतीने ड्रग्जचे संपूर्ण नियोजन करत होता. अखेर त्याला गोवा येथून अटक करण्यात या अधिकार्यांना यश आले. अटकेनंतर त्याच्यासह त्याच्या पत्नीला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले असून या दोघांची या अधिकार्यांकडून कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक धक्कदायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एनसीबीनंतर दानिशचा ताबा मुंबई पोलिसांकडून घेतला जाणार असल्याचे बोलले जाते.