29 वर्षांच्या रेकॉर्डवरील बाईकचोराला मढ येथून अटक
तीन बाईक चोरीच्या गुन्ह्यांची उकल तर दोन बुलेट जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 ऑक्टोंबर 2025
मुंबई, मौजमजेसह झटपट पैशांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी पार्क केलेल्या महागड्या बाईक चोरी करुन पळून जाणार्या एका रेकॉर्डवरील बाईकचोराला मालवणीतील मढ परिसरातून बांगुरनगर पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. सुनिल सुभाष चौधरी असे या आरोपीचे नाव असून त्याच्या अटकेने तीन बाईक चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी दोन बुलेट जप्त केली आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
रवी दिलबाग कंडेरा हे मालाडच्या कुरार व्हिलेज, अण्णापाडा, अष्टविनायक अपार्टमेंटमध्ये राहतात. 14 ऑक्टोंबरला रवी हा त्याच्या बाईकवरुन मालाड येथील इनऑरबीट मॉलमध्ये आला होता. त्याने त्याची बाईक बेसमेंटच्या पार्किंग स्पेसम्ये पार्किंग केली होती. दुसर्या दिवशी तो बाईक घेण्यासाठी गेला होता, यावेळी त्याला त्याची बाईक दिसली नाही. बाईक चोरी झाल्याचे लक्षात येताच त्याने बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी बाईक चोरीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता.
पार्किंग स्पेससह परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता आरोपी बाईक घेऊन मालवणीच्या दिशेने गेल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश बागल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र आव्हाड, पोलीस निरीक्षक अमीत शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोळकर, पोलीस हवालदार भूषण भोसले, पोलीस शिपाई नितीन दळवी, निशिकांत शिंदे, मिथून गावीत यांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. चार दिवस मालाडच्या मालवणी, मढ परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून अखेर सुनिल चौधरी या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
चौकशीत तो रेकॉर्डवरील बाईक चोर असल्याचे उघडकीस आले. सुनिल हा मूळचा जळगावच्या मुक्ताईनगरचा रहिवाशी आहे. गेल्या दोन वर्षांत त्याने विलेपार्ले पोलीस ठाण्यात सहा, वर्सोवा पोलीस ठाण्यात चार, बांगुरनगर, आरे, मुलुंड, आणि आंबोली पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक अशा चौदा बाईक चोरी केल्याची कबुली दिली आहे. चोरीच्या बाईक तो त्याच्या जळगाव येथील गावी नेत होता. त्याच्या अटकेने इतर तीन बाईक चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या तीनपैकी दोन गुन्ह्यांतील दोन बुलेट पोलिसांनी हस्तगत केली आहे. बाईक चोरीच्या गुन्ह्यांत जामिनावर बाहेर आल्यानंतर सुनिल हा वारंवार असे गुन्हे करत होता. गुन्हा करताना तो चांगला पेहराव करुन तोंडावर मास्क व पाठीवरील बॅगेत हेल्मेट आणि कटर ठेवत होता. मौजमजा तसेच झटपट श्रीमंत होण्यासाठी तो बाईक चोरी करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.