हेव्ही डिपॉझिटच्या पैशांचा अपहार करुन बहिण-भावाची फसवणुक
अठरा लाखांच्या फसवणुकीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – वरळीच्या अॅनी बेझंट रोडवर असलेल्या लोटस इमारतीमधील दोन फ्लॅटसाठी घेतलेल्या हेव्ही डिपॉझिटचा सुमारे अठरा लाखांचा अपहार करुन एका बहिण-भावाची तीन भामट्यांनी फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिन्ही भामट्याविरुद्ध ताडदेव पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. सरवर अन्वर खान, मोहम्मद इरफान कुरेशी आणि मुस्ताकअली मोहम्मद हनीफ मंसुरी अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
41 वर्षांची कमरुनिसा मोहम्मद इस्तियाक शेख ही महिला नागपाडा परिसरात राहते. तिचे पती इलेक्ट्रीशियन असून त्यांना मिळणार्या पैशांतून त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवितो. ती राहत असलेली रुम लहान असल्याने तिला मोठ्या रुमची गरज होती. याबाबत तिने तिच्या भावाला सांगितले होते, तिच्या भावाने तिला इस्टेट एजंट सरवर खानशी ओळख करुन दिली होती. त्याने त्याच्या मालकीचे वरळीतील अॅनी बेझंट रोड, व्ही. पी नगर, लोटस अपार्टमेंटच्या ए विंगमधील 203 क्रमांकाचा फ्लॅट असल्याचे सांगितले होते. तो फ्लॅट त्याला हेव्ही डिपॉझिटवर भाड्याने द्यायचे आहे असे सांगितले होते. त्यामुळे ती तिच्या भावासोबत फ्लॅट पाहण्यासाठी गेली होती. तिथेच तिची मोहम्मद इरफानशी ओळख झाली होती.
फ्लॅट आवडल्याने तिने तो फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर घेण्याचा निर्णय घेतला होता. चर्चेअंती त्यांच्यात दहा लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट भाड्याने देण्याचे ठरले होते. त्यानंतर तिने त्यांना टप्याटप्याने दहा लाख रुपये दिले होते. या फ्लॅटमध्ये आधीच काही भाडेकरु राहत होते, दोन महिन्यानंतर फ्लॅट खाली होताच त्यांना फ्लॅटचा ताबा दिला जाईल असे सरवर आणि मोहम्मद इरफानने सांगितले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही. त्यामुळे त्यांनी तिला 25 हजाराप्रमाणे पावणेतीन लाख रुपये भाडे म्हणून दिले होते. याच दरम्यान तिला सरवरने मोहम्मद इरफान आणि मुस्ताकअलीच्या मदतीने अशाच प्रकारे अनेकांना हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट देतो असे सांगून फसवणुक केली. मूळात तो फ्लॅट सरवरच्या मालकीचा नसून तो सर्वांना त्याचा फ्लॅट असल्याचे गंडा घालत होता.
अशाच प्रकारे त्यांनी कमरुनिसाचा भाऊ झिशान अब्दुल रौफ शेख याला याच इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 610 हेव्ही डिपॉझिटवर देतो असे सांगून त्याच्याकडून आठ लाख रुपये घेतले होते. मात्र त्यालाही फ्लॅटचा ताबा दिला नव्हता. हा प्रकार उघडकीस येताच या बहिण-भावांनी त्यांच्याकडे हेव्ही डिपॉझिटच्या पैशांची मागणी सुरु केली होती, मात्र त्यांनी त्यांना पैसे परत केले नाही. या पैशांचा परस्पर अपहार करुन या बहिण-भावांची फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी ताडदेव पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर इस्टेट एजंट सरवर खान, मोहम्मद इरफान आणि मुस्ताकअली मोहम्मद या तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून याच गुन्ह्यांत या तिघांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले असून त्याच माहिती काढली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांकडून फसवणुक झालेल्या व्यक्तींनी ताडदेव पोलिसांशी संपर्क साधावा असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.