व्यवसायात गुंतवणुकीच्या बहाण्याने व्यावसायिकाची फसवणुक
१.४० कोटीच्या फसवणुकीप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१७ ऑगस्ट २०२४
मुंबई, – व्यवसायात गुंतवणुकीच्या बहाण्याने एका व्यावसायिकाची १ कोटी ४० लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार ग्रॅटरोड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अभिषेक मारुती वाडकर या आरोपी व्यावसायिकाविरुद्ध डी. बी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. आतापर्यंतच्या तपासात अभिषेक हा फेब्रुवारी महिन्यापासून फरार असून तो गेल्या सात महिन्यांपासून त्याच्या घरीही गेला नसल्याचे उघडकीस आले आहे.
राजेंद्र महादेव तुपलोंडे हे ग्रॅटरोड येथे राहत असून त्यांची राजन ई सर्व्हिसेस नावाची एक कंपनी आहे. ही कंपनी मोबाईल रिचार्ज, डिश टिव्ही, केबल रिचार्ज, विविध कंपन्यांच्या मोबाईलचे पोस्ट पेड बिल, फ्लाईट बुकींग आणि डोमेस्टिक मनी ट्रान्स्फरचा व्यवहार करते. या व्यवसायासाठी त्यांनी विविध कंपनीकडून डिस्ट्रीब्युटरशीप घेतली आहे. चार वर्षांपूर्वी त्यांनी दिल्लीतील नोएडा परिसरातील एका कंपनीकडून डिजीटल गुड्स (ई-टॉप ऍप) विकत घेतले होते. या कंपनीत अभिषेक वाडकर हा कामाला होता. त्यामुळे व्यवसायानिमित्त त्यांची त्याच्याशी ओळख झाली होती. २०२१ साली अभिषेकने व्यकंटेश वारुलसोबत स्वतची एक गिफ्टींग ट्रिझर युटिलिटी सर्व्हिस नावाची कंपनी सुरु केली होती. यावेळी त्याने त्यांंना कंपनीचे डिस्टीब्युटर ऑफर केले होते. ही ऑफर चांगली वाटल्याने त्याने त्याच्या कंपनीचे डिस्टीब्युटर होण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर ते त्याच्या कंपनीचे डिजीटल गुड्स खरेदी करु लागले. काही महिन्यानंतर अभिषेकने त्यांना संपर्क साधून त्यांच्या व्यवसायात गुंतवणुकीची ऑफर दिली ोती. या गुंतवणुकीवर त्यांना चांगले कमिशन देण्याचे आश्वासन दिले होते. काही महिन्यांत अभिषेकसोबत चांगली मैत्री झाली होती. तसेच तो व्यवहारात चांगला व्यक्ती वाटल्याने त्यांनी त्याच्या कंपनीत गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्याच्यावर विश्वास ठेवून ऑक्टोंबर २०२२ ते जानेवारी २०२४ या कालावधीत त्यांनी त्याच्या कंपनीत १ कोटी ४० लाख रुपयांची गुंतवणुक केली होती.
या गुंतवणुकीवर त्यांना वेळेवर कमिशन मिळत होते. नंतर त्याने त्यांना कमिशन देणे बंद केले. त्याला संपर्क साधल्यानंतर त्याचा मोबाईल बंद येत हातेता. त्यामुळे ते दादरच्या अभिषेकच्या कार्यालयात गेले होते. तिथे त्यांना त्याचे कार्याल बंद असल्याचे दिसून आले. त्याच्या पत्नीकडे विचारणा केल्यानंतर अभिषेक हा फेब्रुवारी २०२४ पासून घरी आला नसल्याचे समजले. गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे सांगून अभिषेकने त्यांना व्यवसायात १ कोटी ४० लाख रुपये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले आणि मूळ रक्कमेसह कमिशन न देता त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी डी. बी मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अभिषेकविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अभिषेक हा पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.