८ कोटी ६८ लाखांच्या हिर्यांचा अपहारप्रकरणी ब्रोकरविरुद्ध गुन्हा दाखल
भारत डायमंड बोर्सच्या आठ हिरे व्यापार्यांची फसवणुक केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – हिरे व्यापार्यांना विक्रीसाठी दिलेल्या ८ कोटी ६८ लाख रुपयांचा हिर्यांचा अपहार करुन आठ हिरे व्यापार्यांची एका ब्रोकरने फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार वांद्रे येथील भारत डायमंड बोर्समध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी मेहुल सतीश झव्हेरी याने या ब्रोकरविरुद्ध बीकेसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. जानेवारी महिन्यांत हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.
ताडदेव येथे राहणारे आनंद अरविंदकुमार शाह हे हिरे व्यापारी असून त्यांचा हिरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्समध्ये त्यांची एक कंपनी असून याच कंपनीतून त्यांचा हिरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय चालतो. गेल्या चौदा वर्षांपासून ते मेहुल झव्हेरीला ओळखत असून तो हिरे खरेदी-विक्रीचा ब्रोकर म्हणून परिचित आहे. या कालावधीत त्याने अनेकदा त्यांच्याकडून हिरे घेऊन त्याची काही व्यापार्यांना विक्री केली होती. त्यामुळे त्याच्यावर त्यांचा विश्वास होता.
१६ जानेवारीला मेहुल हा त्यांच्या कार्यालयात आला होता. त्याच्याकडे एक चांगला हिरे व्यापारी आला असून त्याला विविध डिझाईनच्या हिर्यांची गरज असल्याचे सांगितले होते. मेहुलसोबत त्यांनी याआधीही व्यवहार केला होता, त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला १६ जानेवारीला ३६ लाख ४८ हजार, १७ जानेवारीला ४० लाख ८० हजार, १८ जानेवारीला १६ लाख ८ हजार, २४ जानेवारीला ३३ लाख ४१ हजार रुपयांचे सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचे हिरे दिले होते. दहा दिवसांत व्यवहार पूर्ण करुन पेमेंट किंवा हिरे परत करण्याचे त्याने त्यांना आश्वासन दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने हिरे किंवा हिर्याच्या विक्रीतून आलेले पेमेंट त्यांच्या कार्यालयात जमा केले नाही. कॉल केल्यानंतर मेहुलने तो कार्यालयात येत असल्याचे सागितले. मात्र तो कार्यालयात आला नाही. नंतर त्याने त्यांना प्रतिसाद देणे बंद केले होते.
त्याच्याविषयी केलेल्या चौकशीत मेहुलने त्यांच्यासह भारत डायमंड बोर्समधील इतर काही व्यापार्याकडून अशाच प्रकारे क्रेडिटवर हिरे घेतले होते. मात्र कोणालाही पेमेंट किंवा हिर्यांचे पेमेंट दिले नव्हते. त्यात कृष्णामित एक्सपोर्टकडून ६९ लाख २४ हजार, दृष्टी डियाम एलएलपीकडून १ कोटी २४ लाख, अमोर ज्वेलकडून ७० लाख ७ हजार, व्ही. डी इंपेक्सकडून २ कोटी ६२ लाख, हार्दिक जेम्सकडून ३५ लाख, सावन कार्पोरेशनकडून ९५ लाख ९६ हजार, सुरज जेम्सकडून २५ लाख ७६ हजार आणि युग जेम्स कंपनीकडून १२ लाख ४८ हजार असे ८ कोटी ६८ लाख ७१ हजार रुपयांचे हिरे घेतले होते. हिरे घेतल्यानंतर तो पळून गेला होता. त्याचा कोणाशीही संपर्क होत नव्हता. विक्रीसाठी दिलेल्या हिर्यांचा अपहार करुन त्याने आठ हिरे व्यापार्यांची फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच आनंद शाह यांनी त्यांच्यासह इतर व्यापार्याच्या वतीने बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मेहुल झव्हेरीविरुद्ध हिर्यांचा अपहार करुन व्यापार्यांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मेहुल हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.