६३ लाखांच्या हिर्यांचा अपहारप्रकरणी हिरे दलालाला अटक
आग्रा येथील व्यापार्यासाठी क्रेडिटवर घेतलेले हिरे घेऊन पलायन
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ मार्च २०२४
मुंबई, – सुमारे ६३ लाख रुपयांच्या हिर्यांचा अपहारप्रकरणी अरविंद जैन ऊर्फ कासलीवाल या ६५ वर्षांच्या वयोवृद्ध हिरे दलालास बीकेसी पोलिसांनी अटक केली. आग्रा येथील हिरे व्यापार्यासाठी क्रेडिटवर घेतलेल्या हिर्यांचा अपहार करुन अरविंदने पलायन केल्याचा आरोप असून याच गुन्ह्यांत तो गेल्या तीन महिन्यांपासून वॉण्टेड होता. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
व्यवसायाने हिरे व्यापारी असलेले नरेंद्र उमेदमल जैन यांची ऑरो क्रिएशन्स नावाची एक कंपनी आहे. या कंपनीचे कार्यालय वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्समध्ये आहे. याच ठिकाणी अरविंद जैन याचे कार्यालय असून तो हिरे दलाल म्हणून काम करत होता. अंधेरीतील लोखंडवाला परिसरात राहणारा अरविंदला नरेंद्र जैन हे गेल्या तीस वर्षांपासून ओळखतात. त्यांच्यात अनेकदा हिर्यांचा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला आहे. या व्यवहारात अरविंदने दिलेल्या वेळेत पेमेंट केल्याने त्यांचा त्याच्यावर प्रचंड विश्वास होता. मुंबईसह आग्रा, कानपूर, जयपूर आदी शहरातही अरविंद हा हिरे दलालीचे काम करत होता. त्यामुळे त्याचे अनेक हिरे व्यापार्यांशी चांगले संबंध होते. गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यांत तो त्यांच्या कार्यालयात आला होता. त्याच्याकडे आग्रा येथून काही व्यापारी आले आहेत. त्यांना काही हिर्यांची गरज आहे. त्यामुळे त्याने त्यांच्याकडे हिर्यांची मागणी केली होती. हिर्यांच्या विक्रीतून तातडीने पेमेंट किंवा विक्री न झालेले हिरे परत आणून देण्याचे आश्वासन दिले होते. अरविंदवर विश्वास असल्याने त्यांनी त्याला ५ ऑक्टोंबर ते २३ ऑक्टोंबर या कालावधीत ६३ लाख ५३ हजार ४७७ रुपयांचे विविध कॅरेटचे हिरे दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने हिर्यांच्या विक्रीतून आलेले पेमेंट जमा केले नव्हते. तसेच विक्री न झालेले हिरे परत कार्यालयात आणून दिले नाही. त्यामुळे त्यांनी त्याला फोन केला. मात्र तो त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता.
याच दरम्यान त्यांना अरविंद हा त्याचे कार्यालयाची विक्री करुन पळून गेल्याचे समजले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी अरविंद जैनविरुद्ध बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच अरविंद हा पळून गेला होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच त्याला तीन महिन्यानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले. चौकशीत त्यानेच या हिर्यांचा अपहार करुन फसवणुक केल्याची कबुली दिली. आहे. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याने अशाच प्रकार अन्य काही हिरे व्यापार्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.