समुद्रात उडी घेऊन वयोवृद्ध हिरे व्यावसायिकाची आत्महत्या

व्यवसायात नुकसानीमुळे मानसिक तणावात होते

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ जुलै २०२४
मुंबई, – मॉर्निंग वॉकला जातो असे सांगून एका ६५ वर्षांच्या वयोवृद्ध हिरे व्यावसायिकाने कुलाबा येथील हॉटेल ताजजवळील नॉर्थ कोर्ट समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. संजय शांतीलाल शहा असे या वयोवृद्ध व्यावसायिकाचे नाव असून व्यवसायात आलेल्या नुकसानीमुळे ते मानसिक तणावात होते. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी समुद्रात उडी घेऊन जीवन संपविल्याचे बोलले जाते. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी एडीआरची नोंद केली असून लवकरच त्यांच्या कुटुंबियांची जबानी नोंदविण्यात येणार आहे.

संजय शहा हे त्यांच्या कुटुंबियांसोबत महालक्ष्मी येथील भुलाभाई देसाई रोड, महालक्ष्मी मंदिराजवळील शिला अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक ५५ मध्ये राहत होते. त्यांचा हिर्‍यांचा खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून त्यांना व्यवसायात प्रचंड नुकसान झाले होते. त्यातच त्यांचा व्यवसाय घाट्यात सुरु होता. त्यामुळे ते मानसिक तणावात होते. रविवारी सकाळी ते मॉर्निंग वॉकला जातो असे सांगून घरातून निघाले. इमारतीखाली आल्यानंतर त्यांनी एक टुरिस्ट टॅक्सी बुक केली. वांद्रे-वरळी लिंक रोडवर गेले. तिथे तीन ते चार राऊंड मारल्यानंतर ते टॅक्सीचालकाला गेटवे वे इंडियाला नेण्यास सांगितले. कुलाबा येथील ताज हॉटेलजवळील नॉर्थ कोर्ट परिसरात आल्यानंतर त्यांनी समुद्रात उडी घेतली होती. हा प्रकार लक्षात येताच एका पोलीस कर्मचार्‍याने ही माहिती कुलाबा पोलिसांना दिली. काही वेळानंतर कुलाबा पोलीस फायर बिग्रेड जवानांसह घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी या जवानांनी संजय शहा यांना पाण्यातून बाहेर काढले. त्यांना तातडीने सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती नंतर त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली होती.

प्राथमिक तपासात संजय शहा यांना हिरे व्यवसायात प्रचंड नुकसान झाले होते, त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जाते. याप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांची जबानी नोंदविण्यात येणार आहे. त्यांच्या जबानीतून आत्महत्येमागील कारणाचा अधिकृत खुलासा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page