कौटुंबिक वादातून पत्नीची पतीकडून हत्या

हत्येच्या गुन्ह्यांत पतीला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० डिसेंबर २०२४
मुंबई, – कौटुंबिक वादातून कोमल नितीन जांबळे या २५ वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केल्याची घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी दिडोंशी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन आरोपी पती नितीन धोंडीराम जांबळे या ३२ वर्षांच्या आरोपी पतीला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना रविवारी सायंकाळी साडेसात वाजता मालाड येथील कासमबाग, पावती बाई मोरे चाळीत घडली. याच परिसरातील रामजी चोरगे चाळीतील रुम क्रमांक आठमध्ये नितीन हा तची पत्नी कोमल हिच्यासोबत राहत होता. सहा वर्षांपूर्वी या दोघांचा कोर्ट मॅरेज झाला होता. नितीन हा एका खाजगी बँकेत तर कोमल ही खाजगी कंपनीत कामाला होती. लग्नानंतर त्यांच्यात आर्थिक वाद सुरु होता. हा वाद नंतर वाढत गेला. सतत पैशांवरुन होणार्‍या वादाला कंटाळून कोमल ही त्याला सोडून त्याच्या आईकडे राहण्यासाठी गेली होती. तिची आई सुमन रविंद्र शेलार ही मालाड येथील दफ्तरी रोड, ईश्‍वर भवनजवळील छगन वेस्ता चाळीत राहत असून ती केअरटेकर म्हणून कामाला आहे. या दोघांमधील वाद मिटविण्याचा तिनेही प्रयत्न केला होता. मात्र त्यात तिच्या आईला यश आले नाही.

कोमलने पुन्हा घरी यावे यासाठी नितीनचे प्रयत्न सुरु होते. मात्र ती त्याच्यासोबत येण्यास तयार नव्हती. त्यात ती तिच्या मित्रांसोबत फिरत असल्याचा नितीनला संशय होता. घरी येण्यासाठी ती त्याच्याकडे पैशांची मागणी करत होती. त्याचा त्याच्या मनात प्रचंड राग होता. त्यामुळे रविवारी त्याने तिला बोलणी करण्यासाठी बोलाविले होते. ठरल्याप्रमाणे रविवारी साडेसात वाजता कोमल आणि नितीन यांच्यात पुन्हा वाद झाला होता. यावेळी रागाच्या भरात त्याने तिच्यावर तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात तिच्या मानेवर, गळ्यावर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तिला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जोगेश्‍वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

ही माहिती मिळताच दिडोंशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घडलेला प्रकार तिची आई सुमन शेलार हिच्याकडून समजताच पोलिसांनी तिच्या तक्रारीवरुन नितीनविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी पती नितीन जांबळे याला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने कौटुंबिक वादातून त्याने त्याच्या पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page