डोनेशनच्या नावाने फसणुक करणारा जितू गुरुजी गजाआड

सेवाभावी संस्थेला 24 कोटीचे डोनेशनचे गाजर दाखवून गंडा घातला

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – सेवाभावी संस्थेला 24 कोटीचे डोनेशनचे गाजर दाखवून फसवणुक करणार्‍या एका मुख्य आरोपीस डी. बी मार्ग पोलिसांनी अटक केली. जितेंद्र विश्वनाथ सोनार ऊर्फ जितू गुरुजी असे या 47 वर्षीय आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडी आहे. जितू गुरुजी हा शहापूरच्या खर्डी रेल्वे स्थानक, ओल हाऊसचा रहिवाशीअसून त्याची माधव मदन कुरिअर नावाची एक अंगाडिया कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून सेवाभावी संस्थेला शंभर कोटीपेक्षा जास्त डोनेशनच्या नावाने या टोळीने गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांची नावे अमर सिंगणे आणि कमलेश संजय भोसले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अनिल राजेंद्र सुकासे हे मूळचे संभाजीनगरच्या गंगापूरचे रहिवाशी असून त्यांची स्वतची शेती आहे. त्यांचा राजेंद्र सांगळे हे परिचित मित्र असून त्यांचा अमर सिंगणे हा मित्र आहे. त्याने त्यांना तो इंडस टॉवर या कंपनीचे कर्मचारी असल्याचे असल्याचे सांगून त्यांच्या कंपनीमार्फत कोणत्याही सेवाभावी संस्थेस शंभर कोटीपर्यंत डोनेशन दिले जात असल्याचे सांगितले. त्यांच्या ओळखीच्या कोणी सेवाभावी संस्था असल्यास त्यांना माहिती देण्यास सांगितले होते. अनिल सुकासे यांनी त्याला त्यांच्या परिचित आप्पासाहेब वाळके यांची सत्यमेव बहुउद्देशीय सेवा संस्था असल्याचे सांगितले होते. यावेळी अमर सिंगणे या संस्थेला डोनेशन देण्याची तयारी दर्शविली होती. याबाबत त्याने संस्थेच्या पदाधिकार्‍यांशी कॉन्फरन्सवर संभाषण केले होते.

संभाषणानंतर त्याने त्यांना 24 कोटीचे डोनेशन देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्यांना आधी दोन टक्के रक्कम त्यांच्या कंपनीत जमा करावी लागणार होती. याच संदर्भात त्यांची कल्याणच्या एका हॉटेलमध्ये मिटींग झालीह ोती. त्यात राजेंद्र सांगळे, अनिल सुकासे, कमलेश भोसले उपस्थित होते. कमलेश हा त्यांचा कंपनीचा वरिष्ठ अधिकारी असून त्याच्या सांगण्यावरुन त्यांचे डोनेशनचे काम होईल असे सांगण्यात आले होते. यावेळी अमर आणि कमलेशने त्यांना बारा लाख रुपये आगाऊ देण्यास सांगितले होते. त्यांनी तयारी दर्शविल्यानंतर ते दोघेही त्यांना घेऊ जितू गुरुजीकडे घेऊन गेले होते. त्यांच्यावर त्यांच्या कंपनीच्या सर्व आर्थिक व्यवहाराची जबाबदारी असल्याचे सांगण्यात आले होते.

ही रक्कम जितू गुरुजी यांना दिल्यानंतर त्यांच्या सेवाभावी संस्थेला 24 कोटीचे डोनेशन मिळेल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी जितू गुरुजींना टप्याटप्याने नऊ लाख रुपये दिले होते. उर्वरित तीन लाख रुपये कंपनीत जमा करतो असे सांगितले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी त्यांना डोनेशनची रक्कम मिळवून दिली नाही. विचारणा केल्यांनतर ते तिघेही विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचे कॉल घेत नव्हते. नंतर त्यांनी त्यांचे कॉल ब्लॉक केले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी डोनेशनसाठी घेतलेले पैसे परत करण्याची विनंती केली.

मात्र पैसे देतो सांगूनही त्यांनी ही रक्कम परत केली नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच अनिल सुकासे यांनी डी. बी मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. आरोपींचा शोध सुरु असताना जितू गुरुजी हा त्याच्या गिरगाव येथील ऑपेरा हाऊसमधील कार्यालयात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे छापा टाकून जितू गुरुजीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्याने अमर सिंगणे आणि कमलेश भोसले याच्या मदतीने ही फसवणुक केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल आणि सिमकार्ड जप्त केले आहेत. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. सेवाभावी संस्थेला शंभर कोटी डोनेशन देतो असे सांगून या टोळीने अशाच प्रकारे अनेक गुन्हे केल्याचे बोलले जाते. त्यामुळे जितू गुरुजीची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. याकामी त्याला मदत करणारे अमर सिंगणे आणि कमलेश भोसले हे पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page