मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ एप्रिल २०२४
मुंबई, – बाईक आणि कारचालकानंतर आता मुंबई पोलिसांनी ई-बाईक चालकाविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. वाहतूक नियमांचे उल्लघंन करणार्या ई-बाईकचालकाविरुद्ध तीन दिवसांत वाहतूक पोलिसांनी १.६३ लाखांचा दंड वसुल करुन २९० ई-बाईक जप्त केल्या आहेत. याच प्रकरणात २२१ हून अधिक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता नो एंट्री, सिग्नल जम्पिंग करणे, विरुद्ध दिशेने बाईक चालविणे संबंधित चालकांना चांगलेच महागात पडणार आहे. आगामी काळातही अशा चालकाविरुद्ध विशेष कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
गेल्या काही दिवसांत वाहतूक नियंत्रण कक्षाला ई-बाईकचालक विशेषता डिलीव्हरी बॉईजकडून वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लघंन होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. या चालकांकडून इतरांच्या जिवाला धोका निर्माण होईल अशा प्रकारे बाईक चालविली जात असल्याने अशा बेशिस्त चालकाविरुद्ध वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेतली होती. त्यामुळे मुंबईतील सर्वच वाहतूक चौकीच्या प्रभारी पोलीस निरीक्षकांना अशा चालकाविरुद्ध ठोस कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशानंतर ८ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट या कालावधीत वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. या तीन दिवसांत २२१ ई-बाईक चालकाविरुद्ध गुन्हे दाखल करुन त्यांच्याकडून २९० बाईक जप्त करण्यात आले. २७२ चालकाविरुद्ध दिशेने बाईक चालविणे, ४९१ चालकावर सिग्नल जम्पिंग करणे, २५२ चालकावर नो इंट्रीमध्ये प्रवेश करणे तसेच स्थानिक १६१ अशा १ हजार १७६ चालकावर कारवाई करण्यात आली होती. त्यांच्याकडून १.६३ लाखांचा दंड वसुल करण्यात आला. अशा प्रकारे वाहतूक नियमांचे उल्लघंन करुन स्वतसह दुसर्यांच्या जिवाशी खेळ करणार्या ई-बाईक चालकाविरुद्ध विशेषता डिलीव्हरी बॉईज आढळून आल्यास त्यांची मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे.