म्हाडा फ्लॅटसाठी महिलेची ३० लाखांची फसवणुक

मित्रासह दोघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ एप्रिल २०२४
मुंबई, – पवईतील म्हाडा वसाहतीत ९७० चौ. फुटाच्या फ्लॅटसाठी महिलेची सुमारे तीस लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी करुणाकर पुजारी आणि सनी कांबळे अशी या दोघांविरुद्ध पवई पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. करुणाकर हा तक्रारदार महिलेच्या पतीचा जवळचा मित्र असून त्यानेच सनीच्या मदतीने ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा आता पोलिसांकडून तपास सुरु आहे.

५८ वर्षांची तक्रारदार महिला कमल अडिअप्पा परिट ही पवई येथे राहत असून तिचे पती एका खाजगी बँकेतून निवृत्त झाले आहेत. तिचे पती अडिअप्पा परिट यांचे करुणाकर पुजारी हा मित्र असून तो ऑगस्ट २०२२ साली त्यांच्या घरी आला होता. यावेळी त्याने पवईतील म्हाडा वसाहतीत ९७० चौ. फुटाचा एक फ्लॅट असून हा फ्लॅट ८५ लाखांमध्ये देतो असे सांगितले होते. त्याच्या मित्राची म्हाडामध्ये ओळख असून या फ्लॅटच्या गुंतवणुकीला त्यांना आगामी दिवसांत चांगला फायदा होईल असे सांगून त्यांचा विश्‍वास संपादन केला होता. काही दिवसांनी त्याने त्यांना ३७ लाखांचा डीडी भरुन फ्लॅट बुक करा, त्यानंतर त्यांना बँकेतून कर्ज मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी करुणाकरला ऑगस्ट २०२२ रोजी ३७ लाख रुपये दिले होते. काही दिवसांनी करुणाकरने त्यांच्याकडे फ्लॅट रजिस्ट्रेशनसाठी तीस लाखांची मागणी सुरु केली होती. त्यामुळे त्यांनी त्याला कॅश स्वरुपात तीन लाख रुपये दिले होते. यावेळी त्याने त्यांना पैसे भरल्याच्या म्हाडाच्या पावत्या दिल्या होत्या. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने फ्लॅटचा ताबा कर्जासाठी फ्लॅटचे कागदपत्रे दिले नव्हते. विविध कारण सांगून तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. नंतर त्याने त्यांचे कॉल घेणे बंद केले होते. त्यामुळे कमल परिट हिने पवई पोलिसांत तक्रार केली होती.

पोलिसांत तक्रार केल्याचे समजताच करुणाकरने त्यांनी दिलेले डीडी त्याने सनी कांबळे याला दिल्याचे सांगितले. काही दिवसांनी सनीने त्यांच्या बँक खात्यात सात लाख रुपये पाठवून दिले होते, मात्र उर्वरित तीस लाखांचा अपहार करुन त्यांची परिट कुटुंबियांची फसवणुक केली होती. त्यामुळे कमल परिट हिने पुन्हा पोलिसात तक्रार अर्ज करुन दोन्ही आरोपीविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली होती. या तक्रारीनंतर करुणाकर पुजारी आणि सनी कांबळे या दोघांविरुद्ध पोलिसांनी म्हाडा फ्लॅटसाठी तीस लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच दोन्ही आरोपींची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. म्हाडा फ्लॅटच्या आमिषाने त्यांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page