मामाला एक कोटीच्या खंडणीसाठी धमकाविणार्या भाच्याला अटक
एसीबीमध्ये तक्रार करुन बदनामीची धमकी देऊन खंडणीची मागणी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ फेब्रुवारी २०२४
ठाणे, – एमआयडीसीमधून मुख्य अभियंता म्हणून निवृत्त झालेल्या एका ५९ वर्षांच्या अधिकार्याला त्यांच्याच भाच्याने एक कोटीसाठी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खंडणीसाठी धमकी दिल्याचा गुन्हा दाखल होताच काही तासांत आरोपी भाच्याला खंडणीविरोधी पथकाने अटक केली. मंगेश अरुण थोरात असे या २९ वर्षीय आरोपी भाच्याचे नाव असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. व्यवसायासाठी ६१ लाख रुपयांचे कर्ज दिले असताना त्याने तक्रारदारासह त्यांच्या पत्नीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार करुन बदनामीची तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
सुभाष रामचंद्र तुषे हे ठाण्यातील पाचपाखाडी, टीएमसी कार्यालयाजवळील संत ज्ञानेश्वर मार्गावरील सुमीत एन्क्लेव्ह अपार्टमेंटमध्ये राहतात. ते एमआयडीसीमधून मुख्य अभियंता म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांची पत्नी जयश्री सुभाष तुषे यादेखील एमआयडीसीमध्ये कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी त्यांचा पदाचा राजीनामा दिला आहे. मंगेश हा त्यांचा भाचा असून तो अहमदनगर, सावेडी रोडवरील यशोदानगरच्या प्रेमकुंज अपार्टमेंटमध्ये राहतो. त्याला स्वतचा व्यवसाय सुरु करायचा होता. त्यामुळे जयश्री यांनी त्याला ६१ लाख रुपयांचे कर्ज दिले होते. ही रक्कम मिळाल्यानंतर मंगेशने स्वतचा व्यवसाय सुरु केला होता. मंगेशप्रमाणे जयश्री यांनी उत्तरप्रदेशचा रहिवाशी असलेला पुनितकुमार याच्याकडे व्यवसायानिमित्त सव्वाकोटी रुपयांची गुंतवणुक केली होती. मात्र पुनितकुमार हा त्यांना पैसेत परत देत नव्हता. त्यामुळे पुनितकुमारकडून पैसे वसुलीसाठी जयश्री यांनी मंगेशची मदत घेतली होती. याबाबत त्यांच्यात एक करार झाला होता. या कराराचा गैरफायदा घेऊन मंगेशने त्यांच्यातील संभाषण रेकॉर्डिंग केले होते. ते रेकॉर्डिंग व्हॉटअपवर पाठवून त्यांच्याकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. ही रक्कम दिली नाहीतर त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागा तक्रार करुन त्यांची बदनामीसह जिवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीमुळे सुभाष तुपे आणि जयश्री तुषे हे प्रचंड घाबरले होते. त्यामुळे त्यांनी पोलिसांत एक कोटीच्या खंडणीसाठी धमकी येत असल्याची तक्रार केली होती.
या तक्रारीची पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी गंभीर दखल घेत खंडणीविरोधी पथकाला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशांनतर सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, पोलीस निरीक्षक वनिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कापडनीस, सुनिल तारमळे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कल्याण ढोकणे, पोलीस हवालदार संजय राठोड, सचिन शिंपी, गणेश गुरसाळी, संदीप भोसले, योगीराज कानडे, शितल पावसकर, पोलीस नाईक भगवान हिवरे, पोलीस शिपाई तानाजी पाटील, अरविंद शेजवळ, मयुरी पावसकर यांनी तपासाला सुरुवात केली होती. यावेळी पोलिसांच्या सूचनेनंतर सुभाष तुपे यांनी खंडणीसाठी धमकी देणार्या व्यक्तीला पैसे घेण्यासाठी नवी मुंबईतील खारघर टोलनाका परिसरात बोलाविले होते. बुधवारी १४ फेब्रुवारीला दुपारी साडेतीन वाजता तिथे मंगेश थोरात आला होता. यावेळी त्याला एक कोटीची खंडणीची रक्कम घेताना या पथकाने शिताफीने अटक केली. चौकशीदरम्यान मंगेश हा तक्रारदाराचा भाचा असल्याचे उघडकीस आले. त्यांच्या पत्नीने त्याला कर्जाने दिलेले ६१ लाख रुपये परत मागू नये म्हणून त्याने त्यांना खंडणीसाठी धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मंगेशविरुद्ध ३८४, ३८६, ३८७, ५०६ (२) या भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.