विदेशी नागरिकांची फसवणुक करणार्या सातजणांची टोळी गजाआड
गोरेगाव येथील बोगस कॉल सेंटरवर गुन्हे शाखेची कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२४ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – ऍमेझॉन कंपनीचा प्रतिनिधी असल्याची बतावणी करुन पार्सलच्या नावाने कॅनडा आणि अमेरिकन नागरिकांची फसवणुक करणार्या टोळीचा कांदिवली युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी सातजणांना पोलिसांनी अटक केली असून या कारवाईत सात लॅपटॉप, सात चार्जर, एक राऊटर, सात हेडफोन, आणि सहा मोबाईल असा सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शफीक सिराज बडगुजर, शामसुंदर रामनारायण जैस्वाल, निखील विशाल कक्कर, सुधाकर बलराम पांडे, संजयकुमार रमेशकुमार राईदास, मोहीत विनय पटनायक आणि करण भगवानदास गुप्ता अशी या सातजणांची नावे आहेत. या गुन्ह्यांत जिग्नेश चौहाण, सुरज सिंग आणि परिक्षीत पंड्या या तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. गोरेगाव येथील एका बोगस कॉल सेंटरमध्ये छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली.
गोरेगाव येथील एका कॉल सेंटरच्या माध्यमातून काही विदेशी नागरिकांची फसवणुक केली जात असून त्यांना ब्लॅकमेल करुन बिटकॉईनच्या स्वरुपात पैसे ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले जात असल्याची माहिती कांदिवली युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी शुक्रवारी या पथकाने गोरेगाव येथील आरे कॉलनी, रॉयल पाम, जोहो टेक सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड या कॉल सेंटरमध्ये छापा टाकला होता. यावेळी काही काहीजण लॅपटॉप आणि मोबाईलच्या मदतीने इंटरनेटद्वारे कॉल करुन ऍमेझॉन कंपनीतून बोलत असल्याचे सांगून काही विदेशी नागरिकांची फसवणुक करत असल्याचे उघडकीस आले.
त्यांच्या नावाने मोबाईल, लॅपटॉप व टॅब आदी पार्सल आले असल्याचे इंग्रतीत संभाषण करुन त्यांचा विश्वास संपादन करत होते. समोरील विदेशी व्यक्तीने कुठलेही पार्सल मागविले नसल्याचे सांगितल्यानंतर ही टोळी ते पार्सल त्यांच्या नावाने आणि पत्त्यावर आल्याचे सांगून पार्सल घेतले नाही तर तुम्हाला तेवढी रक्कम भरावी लागेल. जर ऑर्डर रद्द केल्यास त्यांच्याकडून त्यांचे बँक डिटेल्स घेऊन त्यांच्या खात्यात यापूर्वीही काही ऑर्डर आल्याचे सांगून त्या ऑर्डर क्रिमिनल ऍक्टिव्हीटीच्या असल्याने त्यांची माहिती संबंधित शासकीय अधिकार्यांना कॉल ट्रान्स्फरद्वारे देतो अशी भिती घालत होते. याच दरम्यान त्यांच्याशी संबंधित गर्व्हरमेंट ऑथरिटीच्या नावाने पुढील संभाषण करुन दुसरा व्यक्ती बोलत होता. त्याला ब्लॅकमेल करुन त्याच्या खात्यातील रक्कम काढण्यास प्रवृत्त केले जात होते. त्यानंतर त्यांना विविध कारवाईची धमकी देऊन बीटकॉईनच्या माध्यमातून काही बँक खात्यात पैसे पाठविण्यास प्रवृत्त करुन त्यांची फसवणुक केली जात असल्याचे उघडकीस आले.
हा प्रकार उघडकीस येताच तिथे उपस्थित सातही आरोपींना त्यांच्याकडील सव्वातीन लाख रुपयांच्या मुद्देमालासह पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्यविरुद्ध १७०, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंद करुन याच गुन्ह्यांत नंतर सातही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर शनिवारी या सर्वांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना मंगळवार २७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्या चौकशीत त्यांच्या इतर तीन सहकार्यांची नावे समोर आले आहे. त्यांचा आता पोलीस शोध घेत आहेत. प्राथमिक तपासात अशा प्रकारे फसवणुक करणारी ही एक आंतरराष्ट्रीय टोळी टोळी असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या टोळीने आतापर्यंत अनेक कॅनडा आणि अमेरिकन नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणुक केली आहे. या विदेशी नागरिकांचा डेटा प्राप्त करण्याचे काम सुरु आहे. फसवणुकीसाठी त्यांनी गोरेगाव येथे एक बोगस कॉल सेंटर सुरु करुन एक सॉफ्टवेअर बनविले होते. फसवणुक केलेली रक्कम त्यांनी बीटकॉईन या क्रिप्टोकरन्सीमध्ये प्राप्त करुन घेतल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. काही रक्कम त्यांनी आंतरराष्ट्रीय बँक खात्यात जमा केल्याचा संशय असून या बँक खात्याची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.