लुटमारीचा बनाव करुन साडेनऊ लाखांचा कर्मचार्याकडून अपहार
सहा नातेवाईकांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर केल्याचे उघडकीस
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ एप्रिल २०२४
मुंबई, – व्यवसायानिमित्त व्यापार्याकडून जमा केलेली सुमारे साडेनऊ लाखांची कॅश रस्त्यावरुन चारजणांच्या टोळीने पळवून नेल्याची बतावणी करुन पोलिसांचा दिशाभूल करणार्या एका कापड व्यापार्याच्या कर्मचार्याविरुद्ध जोगेश्वरी पोलिसांनी अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. नितेशकुमार सिंग असे या आरोपी कर्मचार्याचे नाव असून त्याने त्याच्या सहा नातेवाईकांच्या बँक खात्यात साडेनऊ लाखांची ही रक्कम ट्रान्स्फर करुन लुटमारीचा बनाव केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. नितेशकुमार हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
सांताक्रुज येथे राहणारे तक्रारदार मोहम्मद मोहीदूर मोजामल्लहक रेहमान हे कापड व्यापारी आहे. त्यांचा कुणाल भरत जैन हा मित्र असून त्यांनी भागीदारीमध्ये जोगेश्वरी येथे कपड्याचा व्यवसाय सुरु केला होता. तिथेच त्यांच्या मालकीचा मारुती गारमेंट नावाचा एक गाळा आहे. त्यांच्याकडे चार कर्मचारी कामाला असून त्यांच्यावर मालाचे सॅम्पल बनविणे, कुरिअर करणे, बँकेत पैसे जमा करणे तसेच कपडे पाठविलेल्या व्यापार्याकडून पेमेंट जमा करणे आदी कामाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. एक महिन्यांपासून नितेशकुमार हा त्यांच्याकडे कामाला लागला होता. सोमवारी ६ मेला कुणाल जैन यांना बाहेरगावी जायचे होते, त्यामुळे त्यांनी नितेशकुमारला एका व्यापार्याकडून पेमेंट जमा करुन कार्यालयात जमा करण्यास सांगितले होते. त्यामुळे तो वडाळा येथील व्यापार्यांकडे गेला आणि त्यांच्याकडून साडेनऊ लाखांची कॅश जमा करुन तो कार्यालयाच्या दिशेने निघाला. मात्र बराच वेळ होऊन तो कार्यालयात आला नाही. त्यामुळे मोहम्मद मोहीदूर यांनी त्याला कॉल केला होता. यावेळी त्याने तो कॅश घेऊन येत असताना त्याला रस्त्यावर चारजणांच्या टोळीने लुटल्याचे सांगितले. या चौघांनी साडेनऊ लाखांची कॅश घेऊन पलायन केले. त्यामुळे तो अंधेरी रेल्वे पोलिसांत तक्रार करण्यासाठी जात आहे असे सांगितले.
या घटनेनंतर मोहम्मद मोहीदूर तिथे गेले होते. तिथे त्यांना नितेशकुमार भेटला. त्याने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर रेल्वे पोलिसांनी वांद्रे आणि अंधेरी रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली. यावेळी फुटेजमध्ये असा कुठलाही प्रकार झाला नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे नितेशकुमारला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने जोगेश्वरी येथील मनी ट्रान्स्फर कार्यालयातून त्याच्या राहत्या गावातील सहा नातेवाईकांच्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर केल्याचे उघडकीस आले. लुटमारीचा बनाव करुन त्यानेच या पैशांचा अपहार केला होता. त्यामुळे ते सर्वजण जोगेश्वरी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी निघाले. याच दरम्यान मोहम्मद मोहीदूर यांना जोरात धक्का देऊन नितेशकुमार हा पळून गेला. घडलेला प्रकार सांगितल्यानंतर जोगेश्वरी पोलिसांनी नितेशकुमारविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. तो उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून सध्या जोगेश्वरी येथे राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.