मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ जानेवारी २०२४
मुंबई, – रॉबरीच्या उद्देशाने गोळीबार करुन एका व्यापार्याचे सुमारे ४७ लाखांचे दागिने घेऊन पळून गेलेल्या गुन्ह्यांचा अवघ्या काही तासात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक करुन त्यांच्याकडून साडेसोळा लाखांचे चोरीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे. किरण धनावडे आणि अरुण मदिया अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
चिराग प्रविणकुमार धंदुकिया हा ३६ वर्षांचा तक्रारदार काळबादेवी येथील रामवाडी, आदर्शवाडीजवळील गणेशभुवन इमारतीमध्ये राहतो. तो सध्या विमल एअर सर्व्हिसमध्ये कुरिअरचे काम करतो. सोमवारी रात्री साडदहा वाजता तो त्याच्या पुतण्यासोबत एका ज्वेलर्स व्यापार्याचे सुमारे ४७ लाखांचे दागिने घेऊन स्कूटरवरुन जात होता. ही स्कूटर पी डिमेलो रोड, सेंट जॉर्ज हॉस्पिटलजवळ येताच तीन ते चारजणांच्या टोळीने त्यांची स्कूटर थांबवून त्याच्या पुतण्याच्या दिशेने रिव्हॉल्व्हरमधून दोन गोळ्या झाडल्या होत्या. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. मात्र अचानक झालेल्या गोळीबारानंतर ते दोघेही प्रचंड घाबरले. काही कळण्यापूर्वीच ते दोघेही त्यांच्याकडील ४७ लाख २७ हजार रुपयांचे दागिने असलेली बॅग घेऊन पळून गेले होते.
गोळीबारासह लुटमारीच्या घटनेची माहिती मिळताच माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी तिथे धाव घेतली होती. याप्रकरणी चिराग धंदुकिया याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रॉबरीसह आर्म्स ऍक्टतर्ंगत गुन्हा दाखल केला होता. गोळीबारासह लुटमारीच्या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल पारस्कर, पोलीस उपायुक्त डॉ. प्रविण मुंढे, सहाय्यक पोलीस आयुक्त तन्वीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक फरीद खान, हेमंत बेंडाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सुरज देवरे व अन्य पोलीस पथकाने तपास सुरु केला होता.
आरोपींच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरु असताना अवघ्या आठ तासांत पळून गेलेल्या किरण धनावडे आणि आणि अरुण मदिया या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ते दोघेही काळबादेवी आणि डोंगरीचे रहिवाशी आहे. चौकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला होता. दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी साडेसोळा लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. त्यांच्या चौकशीत या कटातील इतर दोन आरोपींचे नावे समोर आले आहे. त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. अटकेनंतर या दोघांनाही मंगळवारी सायंकाळी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.