थकबाकी असलेला फ्लॅटच्या बहाण्याने गंडा घालणार्या ठगाला अटक
फ्लॅटसाठी पंधरा लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – खाजगी अर्थपुरवठा कंपनीकडे थकबाकी असलेला फ्लॅट स्वस्तात देतो असे सांगून एका ज्वेलर्स व्यापार्याची सुमारे सव्वापंधरा लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी युगांक विनय शर्मा या ठगाला मालाड पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. युगांक हा रेकॉर्डवरील फसवणुक करणारा गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मालाड, मालवणी आणि पायधुनी पोलीस ठाण्यात अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहे. मालाडच्या फसवणुकीच्या दुसर्या गुन्ह्यांत त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
रमेश मंजूनाथ शेठ हे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत मालाड परिसरात गेल्या वीस वर्षांपासून राहतात. त्यांचा स्वतचा सोन्या-चांदीचे दागिने बनविण्याचा तसेच दुरुस्तीचा व्यवसाय आहे. त्यांचा मुलगा गोरेगाव येथील एका कॉलेजमध्ये शिकतो तर खाजगी ट्यूनमध्ये शिकवणीसाठी जात होता. तिथेच त्याची युगांक शर्माशी ओळख झाली आणि ते दोघेही चांगले मित्र झाले होते. यावेळी युगांकने त्याला त्याचा ट्रक आणि टॅक्सी भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. त्याच्या शेजारीच सुशांत शेट्टी हे राहत असून ते श्रीराम फायनान्समध्ये कर्जाची थकबाकी असलेले फ्लॅट स्वस्तात विक्री करत असल्याचे सांगितले होते. त्याने त्यालाही स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखविले होते. ही माहिती रमेश शेठ यांना त्यांच्या मुलाकडून समजली होती.
युगांकशी भेट घेतल्यानंतर त्याने त्यांना सविस्तर माहिती दिली होती. त्याच्या सल्ल्यानंतर त्यांनी थकबाकी असलेला एक फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला होता. याच दरम्यान त्याने त्यांना दहिसर येथील रुस्तमजी रेसीडेन्सीमध्ये असलेल्या फ्लॅटचे फोटो दाखवून त्याची किंमत 40 लाख रुपये असल्याचे सांगिले होते. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने त्यांना फ्लॅटचे कागदपत्रे दाखविले होते. या कागदपत्रानंतर त्याने त्यांच्या नावावर फ्लॅट बुक करण्यासाठी मॅनेजरला साडेसात लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यामुे त्यांनी त्याला साडेसात लाख रुपये पाठवूनदिले होते.
काही दिवसांनी फ्लॅटच्या रजिस्ट्रेशनसह इतर कामासाठी त्यांच्याकडून आठ लाख ऐंशी हजार रुपये घेतले होते. 2 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2024 या कालावधीत त्यांनी त्याला पंधरा लाख तीस हजार रुपये दिले होते. रजिस्ट्रेशनबाबत विचारणा केल्यानंतर तो त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यांनी त्याला फ्लॅट दाखविण्याची विनंती केली, मात्र त्याने त्यांना फ्लॅट दाखविला नाही. या घटनेनंतर त्यांना शंका आली होती, त्यामुळे त्यांनी त्याला फ्लॅट दाखव नाहीतर फ्लॅटसाठी घेतलेले पैसे परत करण्याची धमकी दिली होती. मात्र वारंवार विचारणा करुनही त्याने त्यांना प्रत्यक्षात फ्लॅट दाखवला नाही. नंतर त्याने त्याचे कॉल घेणे बंद केले.
याच दरम्यान त्यांना युगांक हा फ्रॉड असून त्याने अशाच प्रकारे अनेक लोकांची फसवणुक केल्याची माहिती समजली होती. त्याचा सुशांत शेट्टी किंवा श्रीराम फायनान्सशी काहीही संबंध नाही. तो अनेकांना थकबाकी असलेले फ्लॅट स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून गंडा घालत होता. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी युगांक शर्माविरुद्ध मालाड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या युगांकला अखेर पोलिसांनी अटक केली.
युगांक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मालाड, मालवणी आणि पायधुनी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहे. यापूर्वी त्याला मालाड पोलिसांनी एका पत्रकार महिलेची फसवणुक केल्याच्या गुन्ह्यांत अटक केली होती. त्यानंतर त्याला दुसर्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.