फ्लॅटसाठी घेतलेल्या तीस लाखांचा अपहार करुन फसवणुक
शिक्षिकेच्या तक्रारीवरुन फ्लॅटमालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ सप्टेंबर २०२४
मुंबई, – फ्लॅटसाठी घेतलेल्या सुमारे तीस लाखांचा अपहार करुन एका शिक्षिकेची फसवणुक झाल्याचा प्रकार चेंबूर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सुनिल मोहन शिरसाट या फ्लॅटमालकाविरुद्ध चेंबूर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. सुनिलने तक्रारदार शिक्षिकेसह इतर कोणाशी फ्लॅटचा व्यवहार करुन त्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
४४ वर्षांची तक्रारदार महिला शिक्षिका असून तिच्या पतीसह दोन मुलांसोबत गोवंडी परिसरात राहते. सध्या ती माझगावच्या एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करते तर तिचे पती एका न्यूज चॅनेलमध्ये कामाला आहेत. चार वर्षांपूर्वी ते सर्वजण चेंबूर येथील पोस्टल कॉलनीत राहत होते. यावेळी तिला तिच्या मैत्रिणीकडून तिला एक फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे समजले होते. तिथे जाऊन चौकशी केल्यानंतर तिला सुनिल शिरसाट हा त्याच्या फ्लॅटची विक्री करणार असल्याचे समजले होते. त्यामुळे तिने सुनिलची भेट घेतली होती. सुनिलचा पोस्टल कॉलनीतील सुस्वागत सोसायटीच्या इमारत क्रमांक तीनमध्ये ११०९ क्रमांकाचा फ्लॅट होता. हा फ्लॅट त्याने एका कुटुंबाला हेव्ही डिपॉझिटवर दिला होता. फ्लॅट आवडल्याने तिने त्याच्याशी फ्लॅट खरेदी-विक्रीची बोलणी सुरु केली होती. यावेळी सुनिलने तिला फ्लॅटची किंमत ३५ लाख सांगितली होती. त्यास ती तयार झाली आणि तिने टोकन म्हणून त्याला एक लाख रुपये दिले होते. त्यानंतर त्यांना तीस लाख रुपये दिल्यानंतर फ्लॅटचा ताबा देण्याचे तसेच रजिस्ट्रेशननंतर उर्वरित पाच लाख रुपये देण्याचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे तिने सुनिलला जून ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत टप्याटप्याने सुमारे तीस लाख रुपयांचे पेमेंट केले होते. त्यासाठी तिने बँकेतून गृहकर्ज काढले होते. ही रक्कम दिल्यानंतर तिने फ्लॅटचा ताबा देण्याबाबत विचारणा केली होती. यावेळी त्याने एका महिन्यांत फ्लॅटचा ताबा देण्याचे मान्य केले होते.
मात्र एक महिना उलटूनही त्याने फ्लॅटचा ताबा दिला नाही. सोसायटीची निवडणुक होणार असून आपण निवडणुक लढवत असल्याचे सांगून लवकरच ताबा देतो असे सांगितले. मात्र त्याने त्याचे आश्वासन पाळले नाही. विविध कारण सांगून तो तिच्यासह तिच्या पतीला टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे तिने त्याच्याशी केलेला फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार रद्द करुन त्याच्याकडे तीस लाखांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्याने तिला २२ लाखांचा एक धनादेश दिला होता, मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने सुनिल शिरसाटविरुद्ध चेंबूर पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून सुनिलची लवकरच पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.