मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 फेब्रुवारी 2025
मुंबई, – दोन वषांपूर्वी कुर्ला येथे पुर्नविकास इमारतीमध्ये खरेदी केलेल्या दोन रुमची परस्पर दुसर्या व्यक्तींना विक्री करुन एका व्यक्तीची सुमारे तीस लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध विनोबा भावे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जखरईस ब्राझिल किलिक आणि रेलिका ब्राझिल किलिक अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले.
चंद्रशेखर मारुती जाधव हे चालक असून ते त्यांच्या कुटुंबियासोंबत कुर्ला परिसरात राहतात. ते एका शाळेच्या बसमध्ये चालक म्हणून काम करतात. नोव्हेंबर 2022 रोजी कुर्ला येथील बुद्ध कॉलेजजवळील रुबी कॉटेज परिसरात काही इमारतीचे पुर्नविकासाचे काम सुरु करण्यात आले होते. या इमारतीमध्ये काही रुम विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती त्यांना समजली होती. गुंतवणुक म्हणून त्यांना तिथे एक रुम खरेदी करायचा होता. त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले होते. याच दरम्यान त्यांची या परिसरातील प्रॉपटीसह जागेचा मालक जखरईस आणि रेलिका किलिक यांच्याशी ओळख झाली होती. रुम खरेदीसाठी आपण इच्छुक असल्याचे सांगितल्यानंतर या दोघांनीही त्यांच्या मालकीचा दोन रुम प्रत्येकी पंधरा लाखांमध्ये देण्याचा त्यांना आश्वाासन दिले होते.
खरेदी-विक्रीची सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यांनी त्यांना पंधरा लाख रुपये कॅश तर पंधरा लाख धनादेशद्वारे दिले होते. त्यानंतर त्यांच्यात दोन्ही रुमबाबत एक करार झाला होता. या करारासह भाडेपावती आणि ताबापत्र त्यांना देण्यात आले होते. मात्र दिलेल्या मुदतीत या दोघांनी त्यांना रुमचा ताबा दिला नाही. विचारणा केल्यानंतर ते दोघेही त्यांना विविध कारण सांगत होते. त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी संबंधित इमारतीच्या दोन्ही फ्लॅटची पाहणी केली होती. यावेळी त्यांना कालिक यांच्याकडून खरेदी केलेल्या दोन्ही रुममध्ये दुसरेच व्यक्ती राहत असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी ते दोन्ही रुम जखरईस आणि रेलिका यांच्याकडून खरेदी केल्याचे समजले. याबाबत या दोघांना विचारणा केली असता त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. उलट त्यांनाच रुम मिळणार नाही. जास्त रुमविषयी चौकशी करु नका, नाहीतर जिवे मारण्याची धमकी दिली होती.
या प्रकारानंतर चंद्रशेखर जाधव यांनी घडलेला प्रकार विनोबा भावे नगर पोलिसांना सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जखरईस किलिक आणि रेलिका किलिक यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांनाही लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.