मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ डिसेंबर २०२४
मुंबई, – विविध घटनेत चार अल्पवयीन मुलींवर त्यांच्याच परिचित आरोपीने लैगिंक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी चार स्वतंत्र लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तीन आरोपींना अटक केली. या तिघांनाही विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. एक आरोपी अशाच एका पोक्सोच्या गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडीत असून त्याचा ताबा घेऊन त्याला दुसर्या गुन्ह्यांत अटक केली जाणार आहे. एका पिडीत मुलीची शनिवारी जे. जे हॉस्पिटलमध्ये प्रसुती होऊन तिने एका मुलाला जन्म दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
यातील पहिल्या गुन्ह्यांतील पिडीत मुलगी सोळा वर्षांची असून ती शिवडीतील माझगाव परिसरात राहते. आरोपी हुसैन हा तिच्या परिचित असून त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. मार्च २०२४ पूर्वी लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर शिवडीतील त्याच्या राहत्या घरी अनेकदा लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ती गरोदर राहिली होती. शनिवारी १४ डिसेंबरला तिने जे. जे. हॉस्पिटलमध्ये एका मुलाला जन्म दिला आहे. हा प्रकार हॉस्पिटल प्रशासनाकडून समजताच शिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी पिडीत मुलीच्या जबानीतून हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिचा मित्र हुसैनविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हुसैनविरुद्ध अन्य एका पोक्सोच्या गुन्ह्यांची नोंद असून याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. शनिवारी दाखल झालेल्या दुसर्या गुन्ह्यांत त्याचा लवकरच शिवडी पोलीस ताबा घेणार आहे.
दुसर्या घटनेत एका सतरा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी २८ वर्षांच्या फरहाण नावाच्या आरोपीस मेघवाडी पोलिसांनी अटक केली. ४५ वर्षांची तक्रारदार महिला ही जोगेश्वरीत राहत असून पिडीत तिची मुलगी आहे. याच परिसरात फरहाण राहत असून त्याने पिडीत मुलीला प्रपोज करुन तिच्या घाबरट, शांत स्वभावाचा फायदा घेऊन तिच्यावर जुलै ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ती गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तिच्या आईच्या तक्रारीवरुन मेघवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन फरहाणला अटक केली. पिडीत मुलगी गरोदर असल्याने तिला केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पवईतील तिसर्या घटनेत पंधरा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी तिचा २५ वर्षीय प्रियकर धीरज याला पवई पोलिसांनी अटक केली. पिडीत आणि आरोपी गोरेगाव परिसरात राहत असून त्यांचे प्रेमसंबंध होते. सप्टेंबर ते डिसेंबर २०२४ या कालावधीत त्याने तिच्यावर अनेकदा लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार तिच्या आईला समजताच तिने पवई पोलिसांत धीरजविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली. आरोपी हा डिलीव्हरी बॉय म्हणून काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अन्य एका घटनेत गोरेगाव येथे ३६ वर्षांच्या आरोपीस दिडोंशी पोलिसांनी अटक केली. आरोपी अणि बळीत चौदा वर्षांची मुलगी शेजारीच राहत असून एकमेकांच्या परिचित आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता आरोपीने त्याच्या राहत्या घरी असताना काहीतरी गैरकृत्य करण्याच्या उद्देशाने स्वतची पॅण्ट काढून अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार मुलीकडून तिच्या आईला समजताच त्यांनी आरोपीविरुद्ध दिडोंशी पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिन्ही आरोपींना विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते.