इंडस्ट्रियल कोर्टाने स्थगिती दिलेल्या गाळ्याची १.३५ कोटींना विक्री
खाजगी कंपनीच्या एकाच कुटुंबातील तीन संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ एप्रिल २०२४
मुंबई, – इंडस्ट्रियल कोर्टाने स्थगिती दिलेल्या गाळ्याच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन एका व्यावसायिकाची १ कोटी ३५ लाख रुपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी खाजगी कंपनीच्या एकाच कुटुंबातील तीन संचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. राकेश लुनकरण ओझा, सुयश राकेश ओझा आणि अरुणा राकेश ओझा अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
७३ वर्षांचे वयोवृद्ध सुरेश ग्यानचंद कुमार हे विलेपार्ले येथील जेव्हीपीडी स्किम परिसरात राहत असून त्यांची ओसाका टेक्सटाईल्स नावाची कपड्याची कंपनी आहे. त्यांच्या कंपनीचे कार्यालयासह गाळा अंधेरीतील एमआयडीसी परिसरात आहे. या व्यवसायात त्यांना त्यांची मुलगी आदिती ही मदत करते. सुरेश यांना त्यांच्या मुलीच्या नावाने काही प्रॉपटीमध्ये गुंतवणुक करायची होती, त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान त्यांना अंधेरीतील महाकाली गुंफा, नंदभवन इंडस्ट्रिअल इस्टेटमध्ये एल्कॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा एक गाळा विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती समजली होती. त्यामुळे त्यांनी संबंधित इस्टेटच्या पदाधिकार्यांशी भेट घेऊन गाळ्याची खरेदी-विक्रीबाबत चर्चा केली होती. यावेळी या पदाधिकार्यांनी त्यांना गाळ्यावर कुठलेही कर्ज नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी कंपनीचे संचालक राकेश, सुयश आणि अरुणा यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत गाळ्याचा व्यवहार सुरु केला होता. चर्चेअंती त्यांच्यात १ कोटी ३५ लाखांमध्ये गाळा खरेदी-विक्रीचा सौदा पक्का झाला होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी ओझा कुटुंबियांना १ कोटी ३५ लाख रुपयांचे पेमेंट केले होते. यावेळी त्यांच्यात झालेल्या करारात गाळ्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज, सरकारी देणे आणि इतर कुठल्याही प्रकारचे कर्ज नसून हा गाळा सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्त असल्याचे नमूद केले होते. सर्व व्यवहार पूर्ण झाल्यानंतर सुरेश कुमार यांनी गाळ्याचा ताबा घेतला होता.
एप्रिल २०२२ रोजी त्यांना इंडस्ट्रियल कोर्टातून एक नोटीस प्राप्त झाली होती. त्यात या गाळ्याबाबत वाद सुरु असून कंपनीच्या कर्मचार्यांनी संचालकाविरुद्ध एक याचिका दाखल केली होती. त्यामुळे या खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत या गाळ्याच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराला अंतरिम स्थगिती देण्यात आली होती. कोर्टाचे आदेश असतानाच ओझा कुटुंबियांनी गाळ्याचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन सुरेश कुमार यांच्याकडून १ कोटी ३५ लाख रुपये घेतले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र ओझा कुटुंबियांनी पैसे परत न करता सुरेश कुमार यांची फसवणुक केली होती. या घटनेनंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे तिन्ही संचालकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर राकेश ओझा, सुयश ओझा आणि अरुणा ओझा या तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.