गांजा तस्करी करणार्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
जळगाव येथून मुंबईत आणलेल्या गांजासह त्रिकुटास अटक ३७४ किलो गांजासह कार, टेम्पो असा १.२४ कोटीचा मुद्देमाल जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – गांजा तस्करी करणार्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. यावेळी जळगाव येथून मुंबई शहरात विक्रीसाठी आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या गांजासह एका त्रिकुटास पोलिसांनी गजाआड केले. गोपाळ नाटलेकर, शरद पाटील, सुनिल मोहीते अशी या तिघांची नावे असून ते तिघेही जळगाव आणि संभाजीनगरचे रहिवाशी आहे. या कारवाईत पोलिसांनी ३७४ किलो गांजा, एक कार आणि टेम्पो असा १ कोटी २४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक धनश्याम नायर यांनी सांगितले. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर तिन्ही आरोपींना स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही वर्षांत इतर राज्यातून मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होत असल्याने अशा तस्कराविरुद्ध गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना जळगाव येथून कोट्यवधी रुपयांचा गांजा विक्रीसाठी मुंबईत येणार असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक धनश्याम नायर यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी प्रभारी पोलीस निरीक्षक धनश्याम नायर, पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर, अजीत गोंधळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माळी, जयदीप जाधव, शैलेश खेडकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंद्र लेंबे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंकुश न्यायनिर्गुणे, अशोक भुजबळ, रविंद्र राणे, पोलीस हवालदार विलास देसाई, हरेश कांबळे, सुजीत घाडगे, इक्बाल सिंग, मिलिंद निरभवणे, नितेश विचारे, संजय वायंगणकर, अविनाश चिलप, तानाजी पाटील, पोलीस शिपाई सरफरोज मुलानी, शुभम सावंत, रविंद्र वाघमारे, युवराज सावंत, फुंद्रे, महिला पोलीस शिपाई शुभांगी पाटील, सुप्रिया पाटील यांनी मुलुंड परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती.
गुरुवारी १५ फेब्रुवारी तिथे पोलिसांना एक स्विफ्ट डिझायर कार आणि टेम्पो संशयास्पद येताना पोलिसांनी दिसली. या दोन्ही वाहनांना थांबवून पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता टेम्पोमधून २७४ किलो तर कारमधून शंभर किलो गांजाचा साठा पोलिसांनी जप्त केला. ३७४ किलो या गांजाची किंमत एक कोटी बारा लाख वीस हजार रुपये आहे. या गांजासह बारा लाख रुपयांचे कार आणि टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याच गुन्ह्यांत नंतर गोपाळ नाटलेकर, शरद पाटील, आणि सुनिल मोहिते या तिघांना पोलिसांनी अटक केली. यातील गोपाळ हा जळगावच्या करंजवाडा तर सुनिल भडगाव, लोनपेराचा आणि सुनिल संभाजीनगर, कन्नडचा रहिवाशी आहे. ते तिघेही जळगाव येथून गांजा मुंबई शहरात विक्रीसाठी आले होते. मात्र त्यापूर्वीच या तिघांनाही मुलुंड येथून पोलिसांनी अटक केली. या तिघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदवून नंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. प्राथमिक तपासात गांजा तस्करी करणारी ही आंतरराज्य टोळी असल्याचे उघडकीस आले. या टोळीशी संबंधित इतर काही आरोपींची नावे समोर आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त, लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त चेतन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट पाचचे प्रभारी पोलीस निरीक्षक धनश्याम नायर व त्यांच्या पथकाने केली.