कुर्ल्यानंतर घाटकोपर येथे टेम्पोने सहाजणांना चिरडले

एका महिलेचा जागीच मृत्यू तर इतर चार जखमी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ डिसेंबर २०२४
मुंबई, – कुर्ला येथे बेस्ट बसचालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्यानंतर बसने रस्त्यावरील वाहनांना अनेकांना चिरडल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी सायंकाळी घाटकोपर येथील अशाच प्रकारची दुसरी घटना घडल्याने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. टेम्पोच्या धडकेने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर इतर चारजण जखमी झाले. प्रिती रितेश पटेल असे या ३५ वर्षांच्या मृत महिलेचे नाव आहे तर जखमींमध्ये रेश्मा शेख, मारुफा शेख, तोफा उजहर शेख, मोहरमअली शेख यांचा समावेश आहे. या सर्वांवर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी टेम्पोचालक उत्तम बबन खरात याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता घाटकोपर येथील चिरागनगर, मच्छीमार्केट रोड, आझाद मसाला शॉपसमोर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. उत्तम खरात हा २५ वर्षांचा तरुण टेम्पोचालक आहे. शुक्रवारी सायंकाळी तो टेम्पो घेऊन चिरागनगर येथून जात होता. हा टेम्पो मच्छीमार्केट रोडने जात असातना अचानक त्याचा स्टेरिंगवरील ताबा सुटला आणि त्याने पादचार्‍यावरील पाचजणांना धडक दिली होती. अचानक घडलेल्या या घटनेने तिथे उपस्थित लोकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. अपघातामुळे परिसरातील वाहतूक सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमींना तातडीने जवळच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे प्रिती पटेल या महिलेस मृत घोषित करण्यात आले. प्रिती ही घाटकोपरच्या पारशीवाडी, भगीरथी चाळीत राहत होती.

अन्य जखमींमध्ये तीन महिलांसह एका पुरुषाचा समावेश होता. या सर्वांवर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे बोलले जाते. याप्रकरी उत्तम खरात या टेम्पोचालकाविरुद्ध पोलिसांनी हलगर्जीपणाने टेम्पो चालवून एका महिलेच्या मृत्यूस तर चौघांना गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच रात्री उशिरा त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला शनिवारी दुपारी लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. त्याची मेडीकल करण्यात आली आहे. अपघाताच्या वेळेस त्याने मद्यप्राशन केले होते का याचा पोलीस तपास करत आहेत. अपघातामागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही, मात्र स्टेरिंगमुळे हा अपघात झाल्याचे बोलले जाते.

९ डिसेंबरला कुर्ला येथे एका बेस्ट बसने अशाच प्रकारे काही वाहनांसह पादचार्‍यांना धडक दिली होती. त्यात आठजणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले होते. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोवर शुक्रवारी घाटकोपर परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page