दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नीसह तिघांना मारहाण

सुमारे सव्वालाखांचे दागिने चोरी करुन पतीचे पलायन

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नीसह पत्नीच्या वयोवृद्ध आजी आणि चुलत्याना मारहाण करुन आरोपी पतीने सुमारे सव्वालाखांचे दागिने चोरी करुन पलायन केल्याची घटना घाटकोपर परिसरात घडली. याप्रकरणी चंदू वसीम खान या आरोपी पतीविरुद्ध पंतनगर पोलिसांनी मारहाणीसह जबरी चोरीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे.

सोनाली सुमीत धेंडे ही महिला घाटकोपर येथील डी. बी मार्ग चौक, रमाबाई आंबेडकर नगर, सिद्धार्थ चाळीत राहते. चंदू हा तिचा पती असून त्याला दारु पिण्याचे व्यसन आहे. दारुसाठी तिने पैसे द्यावे म्हणून तो तिला शिवीगाळ करुन मारहाण करत होता. गुरुवारी रात्री तीन वाजता त्याने सोनालीकडे पैशांची मागणी केली होती. तिने त्याला दारुसाठी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात त्याने तिला हाताने आणि लाथ्याबुक्यांनी मारहाण केली. यावेळी तिची आजी अर्चना धेंडे हिने तिला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने त्याने तिच्या तोंडाला, छातीला आणि तोंडाला फाईट मारुन पोटात लाथ्या मारल्या. त्यानंतर तिच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील सोन्याची वेल आणि झुमका काढले. त्यामुळे तिच्या कानाला दुखापत झाली होती. काही वेळानंतर सोनालीचा चुलता निखल आला असता त्याने त्यालाही लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली.

या मारहाणीनंतर तो सुमारे सव्वालाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन तेथून पळून गेला. या मारहाणीत सोनालीसह तिची आजी अर्चना आणि चुलता निखल हे तिघेही जखमी झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर राजावाडी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. औषधोपचारानंतर त्यांना सोडून देण्यात आले. ही माहिती मिळताच पंतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सोनालीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिचा पती चंदू खान याच्याविरुद्ध मारहाणीसह गंभीर दुखापत करणे आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. चंदू हा पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page