घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी दोघांच्या कोठडीत वाढ
आरोपींमध्ये जान्हवी मराठे व सागर कुंभारचा समावेश
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ जून २०२४
मुंबई, – घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. या आरोपींमध्ये इगो मिडीया प्रायव्हेट लिमिटेडची माजी संचालिका जान्हवी मराठे-सोनलकर आणि होर्डिंग उभारणारा कॉन्ट्रक्टर सागर कुंभारे यांच्या समावेश आहे. या दोघांची पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना पोलीस बंदोबस्तात किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांच्या पोलीस कोठडीत २१ जूनपर्यंत वाढ केली आहे.
मे महिन्यांत घाटकोपर येथील एक होर्डिंग कोसळून त्यात सतराजणांना आपला जीव गमवावा लागला होता. या होर्डिंग दुर्घटनेची गृहविभागाने गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशांनतर या गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. हा तपास हाती येताच पोलिसांनी कंपनीचा मुख्य संचालक भावेश भिंडे याला अटक केली होती. त्याच्या चौकशीत इतर आरोपींची नावे समोर आले होते. त्यानंतर होर्डिंगला फिटनेस प्रमाणपत्र देणार्या मनोज संधूला पोलिसांनी अटक केली होती. ते दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या दोघांच्या अटकेनंतर कंपनीची माजी संचालिका जान्हवी मराठे आणि कॉन्ट्रक्टर सागर कुंभारे यांना गोव्यातील एका हॉटेलमधून ८ जूनला पोलिसांनी अटक केली होती. सेशन कोर्टाने अटकपूर्व जामिन अर्ज फेटाल्यानंतर जान्हवी ही पळून गेली होती. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने शनिवार १५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना शनिवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी चौकशीसाठी आणखीन पोलीस कोठडीची मागणी केली होती. ही मागणी मान्य करुन कोर्टाने जान्हवी आणि सागर यांच्या पोलीस कोठडीत २१ जूनपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे या दोघांनाही आता शुक्रवारी पुन्हा किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे.