गणपती मंडपात लपण्यासाठी गेलेल्या मुलीचा विनयभंग

गिरगाव येथील घटना; ५९ वर्षांच्या आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ सप्टेंबर २०२४
मुंबई, – गणपती मंडपात लपण्यासाठी गेलेल्या एका तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर ५९ वर्षांच्या व्यक्तीने अश्‍लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना गिरगाव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपीस व्ही पी. रोड पोलिसांनी अटक केली. रविवारी दुपारी गणेश मंडपात घडलेल्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड व्यक्त होत आहे.

४६ वर्षांची तक्रारदार महिला ही गिरगाव परिसरात राहते. तिला तेरा वर्षांची मुलगी असून ती रविवारी दुपारी तिच्या मित्र-मैत्रिणीसोबत लंपडाव खेळत होती. दुपारी ती जवळच असलेल्या गणेश मंडपात लपण्यासाठी गेली होती. यावेळी तिथे असलेल्या एका ५९ वर्षांच्या व्यक्तीने तिला मागून जोरात मिठी मारली. तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन त्याने तिचा विनयभंग केला होता. या प्रकाराने ती मुलगी प्रचंड घाबरली आणि तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. ही माहिती ऐकून तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तिने व्ही. पी रोड पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच काही तासांत आरोपीस पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला सोमवारी दुपारी पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते.
अश्‍लील व्हिडीओ दाखविणार्‍या तरुणाला अटक
चेंबूर येथील अन्य एका घटनेत एका अकरा वर्षांच्या मुलीला मोबाईलवर अश्‍लील व्हिडीओ दाखविणार्‍या एका २३ वर्षांच्या आरोपी तरुणाला नेहरुनगर पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे या मुलीने अश्‍लील व्हिडीओ एका पोलीस अंमलदाराला देऊन हा प्रकार सांगितल्यांनंतर हा प्रकार उघडकीस आला. ही मुलगी चेंबूर येथे राहत असून रविवारी ८ सप्टेंबरला ती तिच्या घरासमोरील गार्डनमध्ये गुलाल खेळत होती. यावेळी आरोपीने तिच्याकडे गुलाल मागितला. त्यानंतर त्याने तिला मोबाईल सुरु असलेला अश्‍लील व्हिडीओ दाखविला. या मुलीने मोबाईल अश्‍लील व्हिडीओ चालू असताना जवळच असलेल्या कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस अंमलदाराला दिला आणि घडलेला प्रकार सांगितला. हा प्रकार लक्षात येताच या अंमलदाराने आरोपी तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page