मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ जुलै २०२४
मुंबई, – कमी किंमतीत सोन्याचे बिस्कीट देतो असे सांगून एका सोन्याच्या व्यापार्याची सुमारे एक कोटीची फसवणुक करुन पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना पायधुनी पोलिसांनी अटक केली. तेजस राजेंद्र पारीख आणि इफ्तेखार आशिकअली आजम अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी ३५ लाखांची कॅश हस्तगत केली असून उर्वरित कॅश लवकरच जप्त केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
यातील तक्रारदार सोन्याचे व्यापारी असून त्यांचा सोन्याचा होलसेलमध्ये विक्रीचा व्यवसाय आहे. ४ जुलैला त्यांना महेश आणि तेजस नाव सांगणार्या दोन व्यापार्यांचा फोन आला होता. त्यांनी त्यांना कमी किंमतीत सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना मुंबादेवी येथील महाकाली चाळ, आर. के इंटरप्रायजेस या कार्यालयात बोलाविण्यात आले. तिथे आलेल्या तेजस आणि महेश यांनी त्यांच्याकडून एक कोटी रुपयांची कॅश घेतली. त्यांना सोन्याचे बिस्कीट आणून देतो असे सांगून ते दोघेही पळून गेले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पायधुनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत दोन्ही आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम घेण्याचे आदेश पायधुनी पोलिसांना दिल होते. त्यानंतर या पथकाने दोन्ही आरोपींचा शोध सुरु केला होता. त्यांच्या मोबाईलचे सीडीआर प्राप्त करुन पोलिसांनी त्यांचा लोकेशन मिळविण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी ते दोघेही मालाड येथे असल्याचे दिसून आले. त्यामुळे एक टिम मालाडला पाठविण्यात आली होती. त्यानंतर ते दोघेही गिरगाव येथे असल्याचे दिसून आले. त्यामुळे या पथकाने गिरगाव येथील भटवाडी, प्रमोदचंद्र सहकारी सोसायटी परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून तेजस पारीख आणि इफ्तेखार आजम या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. तक्रारदारांनी या दोघांना ओळखून त्यांनीच ही फसवणुक केल्याचे सांगितले. त्यानंतर या दोघांनी एका फ्लॅटमध्ये लपवून ठेवलेली सुमारे ३५ लाखांची कॅश पोलिसांनी जप्त केली. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर दोघांनाही रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून लवकरच उर्वरित ६५ लाखांची कॅश हस्तगत केली जाणार आहे. या गुन्ह्यांत त्यांना इतर कोणी मदत केली का याचा पोलीस तपास करत आहेत.