९७ लाखांच्या सोन्याच्या अपहारप्रकरणी मॅनेजरला अटक
आठ वर्षांत टप्याटप्याने १७७२ ग्रॅम सोन्याचा अपहार केला
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ सप्टेंबर २०२४
मुंबई, – सुमारे ९७ लाखांच्या सोन्याच्या अपहारप्रकरणी वॉण्टेड असलेल्या मॅनेजरला गजाआड करण्यात अखेर एमएचबी पोलिसांना यश आले आहे. हितेश दिनेशभाई सोनी असे या ४० वर्षीय मॅनेजरचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. आठ वर्षांत टप्याटप्याने १७७२ ग्रॅम वजनाच्या सोन्याचा अपहार करुन हितेश हा पळून गेला, त्याचा गेल्या एक ते दिड वर्षांपासून पोलिसांकडून शोध सुरु होता. अपहार केलेल्या सोन्याची त्याने परस्पर विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले असून ते सोने लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जतिन ललित धोरडा हे बोरिवली परिसरात राहत असून त्यांचा सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवासाय आहे. चेतन गिरधरलाल सोनी हे त्यांचे भागीदार असून त्यांच्यासोबत त्यांनी बोरिवली परिसरात जी. पी ज्वेलर्स नावाचे एक युनिट सुरु केले होते. ते दोघेही त्यांच्या युनिटमध्ये तयार केलेले दागिने होलसेलमध्ये विक्री करतात. युनिटमध्ये पंधरा कारागिर, कार्यालयात सहा कर्मचारी कामाला आहे तर हितेश सोनी गेल्या आठ वर्षांपासून तिथे मॅनेजर म्हणून काम करत होता. दागिने बनविण्यासाठी जतिन हे अरिहंत बुलियन ऍण्ड ज्वेलर्समधून सोन्याचे बार विकत घेत होते. ते कार युनिटच्या सेफ तिजोरीत ठेवून नंतर टप्याटप्याने ते बार दागिने बनविण्यासाठी कारागिरांना दिले जात होते. जानेवारी २०२३ रोजी जतिन आणि चेतन यांनी युनिटच्या स्टॉकची पाहणी केली होती. यावेळी त्यांना १७७२ ग्रॅम सोन्याचा तफावत असल्याचे दिसून आले.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्याची शहानिशा सुरु केली होती. मॅनेजर म्हणून हितेश सोनीची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत त्यानेच या सोन्याचा अपहार केल्याची कबुली देताना ते दागिने परत करण्याचे आश्वासन दिले होते. यावेळी त्याने शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ९७ लाख ४७ हजार रुपयांचे सोने टप्याटप्याने चोरी करुन त्याचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केल्याचे तसेच ते सर्व सोने परत करण्याचे लिहून दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने सोने परत दिले नाही. त्यामुळे त्याच्या कांदिवलीतील राहत्या घरी त्याचा त्यांनी शोध घेतला, मात्र तिथे तो राहत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांनी हा प्रकार त्याच्या कुटुंबियांना सांगितली होती. हितेशने सोने परत केले नाहीतर त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसल्याने सांगितले होते. यावेळी त्याच्या आई-वडिल, भावाने काही दिवसांची मुदत मागवून घेतली होती.
मात्र हितेशने सोने परत केले नाही. चौकशीदरम्यान हितेश हा त्यांच्याकडे आठ वर्षांपासून कामाला होता. या कालावधीत त्याने टप्याटप्याने १७७२ ग्रॅम वजनाचे सोन्याचा अपहार केला होता. स्टॉकची टॅलीदरम्यान तो सोन्याचे वजन जास्त करुन सांगत होता. त्यामुळे हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नव्हता. हितेशकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच जतिन धोरडा यांनी एमएचबी पोलिसात लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी सोन्याचा अपहारप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. गेल्या एक ते दिड वर्षांपासून त्याचा पोलिसाकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच तीन दिवसांपूर्वी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्याने त्याच्या सोन्याच्या दागिने बनविण्याच्या युनिटमधून सोन्याचा अपहार करुन या सोन्याचा परस्पर विक्री करुन ही फसवणुक केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने विक्री केलेले सोने हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहेत.