मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ ऑगस्ट २०२४
मुंबई, – विक्रीसाठी घेतलेल्या सुमारे एक कोटीचे दागिने घेऊन दोन ज्वेलर्स व्यापार्यांनी पलायन केल्याची घटना काळाचौकी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी विनोद मेहता आणि मयंक पामेचा या दोन्ही आरोपी व्यापार्याविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन या दोघांचा शोध सुरु केला आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही व्यापार्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
शिवडी येथे राहणारे प्रतिक प्रकाश रावल हे ज्वेलर्स व्यापारी आहेत. त्यांचा शिवडीतील टीजे रोडवरील भारत इंडस्ट्रियजमध्ये सोन्याचे दागिने खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. शहरातील अनेक व्यापार्यांना ते होलसेलमध्ये दागिन्यांची विक्री करतात. एप्रिल महिन्यांत त्यांची धनजी स्ट्रिट, सुतारिया भवनातील सिद्धीविनायक गोल्डचे मालक विनोद मेहता यांच्याशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. त्यांच्याशी व्यवहार करण्याची इच्छा व्यक्त करुन विोद मेहता आणि मयंक पामेचा यांनी त्यांच्याकडून ८ एप्रिल ते ७ ऑगस्ट २०२४ या कालावधीत क्रेडिटवर विक्रीसाठी २४ कॅरेटचे १४७६ ग्रॅम वजनाचे सुमारे एक कोटी सात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेतले होते. काही दिवसांत त्यांना दागिन्यांचे पेमेंट करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी दागिन्यांचे पेमेंट केले नाही. संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. चौकशी केल्यानंतर या दोघांनी त्यांचे कार्यालय बंद करुन पलायन केल्याचे समजले. विक्रीसाठी घेतलेल्या दागिन्यांचा अपहार करुन या दोघांनी त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी विनोद मेहता आणि मयंक पामेचा या दोघांविरुद्ध काळाचौकी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी ४०९, ४२० ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ते दोघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.