मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ ऑगस्ट २०२४
मुंबई, – ग्रँटरोड येथील एका कुंटनखान्यात सुरु असलेल्या आणखीन एका सेक्स रॅकेटचा डी. बी मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी मॅनेजर महिलेस अटक करुन दोन महिलांची सुटका केली आहे. या दोन्ही महिलांनी मेडीकलनंतर चेंबूरच्या नवजीवन महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. याच गुन्ह्यांत रेखा सिकंदर साव हिला पोलिसांनी अटक करुन लोकल कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत किशोर गुप्ता ऊर्फ सीएम या आरोपीस पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
विविध आमिष दाखवून इतर राज्यातून आणलेल्या तरुणीसह महिलांना ग्रँटरोड येथील कुंटनखान्यात विक्री करुन तिथे त्यांना जबदस्तीने डांबून वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जाते. अशा कुंटनखान्यासह तिथे चालणार्या सेक्स रॅकेटविरुद्ध स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असतानाच ग्रँटरोडच्या एसव्हीपी रोड, नूर मोहम्मद इमारतीच्या कॉंग्रेस हाऊसमध्ये काही महिलांना डांबून वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर मंगळवारी रात्री बारा वाजता स्थानिक पोलिसांनी कॉंग्रेस हाऊसच्या रुम क्रमांक चारमध्ये छापा टाकला होता. यावेळी तिथे असलेल्या महिलांच्या मदतीने रेखा साव ही महिला सेक्स रॅकेट चालवत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तिला पोलिसांनी अटक केली तर फ्लॅटमधून दोन महिलांची सुटका केली. रेखा ही किशोर गुप्ताच्या मदतीने तिथे सेक्स रॅकेट चालवत होती. त्यामुळे या दोघांविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहितासह पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर रेखा सावला पोलिसांनी अटक केली तर पळून गेलेल्या किशोर गुप्ताचा पोलीस शोध घेत आहेत. सुटका केलेल्या दोन्ही महिलांना नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीकलनंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले.