१.१४ कोटीचे दागिने घेऊन सेल्समन कर्मचार्याचे पलायन
काळबादेवीतील घटना; कर्मचार्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ ऑगस्ट २०२४
मुंबई, – नागपूरसह गोंदिया, बालाघाट, आणि आमगावातील ज्वेलर्स व्यापार्यांना विक्रीसाठी दिलेले एक कोटी चौदा लाख रुपयांचे विविध सोन्याचे दागिने घेऊन सेल्समन कर्मचार्याने पलायन केल्याची घटना काळबादेवी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हसमुख जयंतीलाल शहा या कर्मचार्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. आशिष रणजीत जैन हे सोने व्यापारी असून ते अंधेरी परिसरात राहतात. त्यांचा काळबादेवी परिसरात उन्नती ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे.
आशिष हे बंगाली कारागिराकडून सोन्याचे दागिने बनवून ते होलसेलमध्ये विक्री करतात. त्यांच्याकडे हसमुख शहा आणि सुरेंद्र रमा बेरडे हे सेल्समन म्हणून काम करतात. हसमुख हा दिड तर सुरेंद्र हा त्यांच्याकडे पाच वर्षांपासून कामाला आहेत. त्यांच्यावर नागपूर, गोंदिया, बालाघाट आणि आमगाव दागिन्यांची विक्रीची जबाबदारी होती. जुलै २०२४ रोजी त्यांनी हसमुखला १ कोटी १४ लाख ४० हजार रुपयांच्या १७८३ ग्रॅम वजनाचे विविध प्रकारचे दागिने विक्रीसाठी दिले होते. या दागिन्यांची त्याला नागपूरसह इतर शहरात विक्री करायची होती. त्यामुळे दुसर्या दिवशी तो नागपूरला रवाना झाला होता. त्याची गोदिंयाच्या एका हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र तिथे गेल्यानंतर त्यांचा त्याच्याशी संपर्क झाला नाही. वारंवार कॉल करुनही तो त्यांना प्रतिसाद देत नव्हता. हा प्रकार संशयास्पद वाटताच ते स्वतला नागपूरला जाण्यासाठी निघाले होते. तिथे गेल्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये हसमुखची चौकशी केली. मात्र तो तिथे आला नसल्याचे त्यांना समजले. त्यामुळे त्यांनी स्थानिक ज्वेलर्स व्यापार्यांना संपर्क साधून हसमुखविषयी विचारणा केली. यावेळी नसिंग ज्वेलर्सचे मालक तन्मय हलानी यांनी त्यांना हसमुखचा कॉल आला होता. त्याने त्याची प्रकृती ठिक नसल्याचे सांगून त्याच्याकडे सोने आणि कॅश असल्याने तो तिथे येऊ शकत नाही असे सांगितले होते.
चौकशीनंतर हसमुख हा तेथील दिगंबर जैन धर्मशाळेत दोन दिवस वास्तव्यास होता, मात्र नंतर तो निघून गेला होता. हसमुख हा सोन्याचे विविध सोन्याचे दागिने घेऊन पळून गेल्याची खात्री होताच आशिष जैन हे मुंबईत परत आले होते. त्यांनी काही दिवस त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून हसमुख शहा याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर हसमुखविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे.