क्रेडिटवर दिलेल्या हिरेजडीत सोन्याच्या दागिन्यांचा अपहार
१.१३ कोटीच्या अपहारप्रकरणी व्यापार्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ सप्टेंबर २०२४
मुंबई, – क्रेडिटवर दिलेल्या हिरेजडीत दागिन्यांचा अपहार केल्याप्रकरणी एका ज्वेलर्स व्यापार्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. टोजो कलवकट्ट जोस असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा केरळचा रहिवाशी आहे. त्याच्या अटकेसाठी एक टिम लवकरच केरळला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. क्रेडिटवर घेतलेल्या दागिन्यांची पार्ट पेमेंट करुन त्याने सुमारे अडीच कोटीचे दागिने घेतले, त्यापैकी काही रक्कम देऊन त्याने त्यांची एक कोटी तेरा लाखांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस अले आहे.
रवी मानक जैन हे विद्याविहार परिसरात राहत असून सोन्याचे व्यापारी आहेत. त्यांचा सोन्यासह हिरेजडीत दागिने होलसेल विक्रीचा व्यवसाय असून काळबादेवी परिसरात त्यांचा नाईस डायमंड नावाचे एक दुकान आहे. आठ वर्षांपूर्वी चेन्नईच्या तामिळनाडू शहरात सोन्याच्या दागिन्यांचे प्रदर्शन होते. तिथे त्यांची ओळख ज्वला डायमंड या ज्वेलर्स दुकानात काम करणार्या टोजो जोस याच्याशी झाली होती. या ओळखीनंतर त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केले होते. दोन वर्षांनी त्याने त्यांना फोन करुन तो स्वतचा व्यवसाय सुरु करत आहे. त्याने तिथेच पत्नीच्या नावाने मिलानो ज्वेलर्स ऍण्ड डायमंड नावाची एक कंपनी सुरु केली आहे. त्यासाठी त्यांनी त्याला मदत करावी अशी विनंती केली होती. तो मुंबईसह इतर शहरातील व्यापार्याकडून दागिने घेऊन त्याची केरळच्या विविध शहरात विक्री करत असल्याने त्यांनी त्याला मदत करण्याचे ठरविले होते. ऑक्टोंबर २०२३ रोजी तो त्यांच्या काळबादेवी येथील शॉपमध्ये आला होता. यावेळी त्याने त्यांच्याकडून ४३ लाख ७२ हजार रुपयांचे विविध ४२२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेतले होते. त्यानंतर त्यांच्यात दागिन्यांची देवाणघेवाण सुरु होती. त्यापैकी त्याने सात व्यवहारातील काही दागिन्यांचे ४७ लाखांचे पेमेंट केले तर उर्वरित दागिने त्यांना परत पाठविले होते. त्यामुळे त्यांना त्याच्यावर विश्वास बसला होता.
५ ऑक्टोंबर २०२३ ते ३ एप्रिल २०२४ या कालावधीत त्यांनी त्यांच्याकडून २ कोटी ४६ लाख रुपयांचे दागिने घेतले होते. त्यापैकी १ कोटी ३२ लाख रुपयांचे पेमेंट केले. मात्र उर्वरित एक कोटी तेरा लाखांचे पेमेंट वारंवार विचारणा करुनही त्याच्याकडून आले नाही. विविध कारण सांगून तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. काही दिवसांनी त्याने त्यांचे कॉल घेणे बंद केले होते. टोजोकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. टोजोने अशाच प्रकारे इतर काही ज्वेलर्स व्यापार्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.