सव्वासहा कोटीच्या दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक
तीन स्वतंत्र गुन्ह्यांत चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ जानेवारी २०२५
मुंबई, – सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिलेल्या सुमारे सव्वासहा कोटीच्या शुद्ध सोन्याचा अपहार करुन पाच ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक झाल्याचा धक्कादायक प्रकार काळबादेवी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकणी एल. टी मार्ग पोलिसांनी तीन स्वतंत्र अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद करुन पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला आहे. त्यात तीन ज्वेलर्स व्यापार्यासह एका कारागिराचा समावेश आहे. संजय साधन साहू, संजय सामंता, तेजस ललित सोनी आणि हेमंदर हिरालाल जैन अशी या चौघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भैरुलाल मोहनलाल जैन हे भायखळा परिसरात राहत असून ज्वेलर्स व्यापारी आहेत. त्यांचा काळबादेवी येथील काकड मार्केटमध्ये होलसेलमध्ये सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. संजय साहू हा त्यांचा परिचित असून त्याने त्यांच्याकडून गेल्या वर्षी १४ नोव्हेंबरला अकराशे ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने आणि १८ नोव्हेंबर दोन हजार ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने दागिने बनविण्यासाठी घेतले होते. त्यापैकी १७९ ग्रॅम वजनाचे दागिने बनवून दिले. उर्वरित २९३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बनवून दिले नाही. अशाच प्रकारे त्याने निर्वाण ज्वेल्स दुकानाचे मालक प्रिंसकुमार प्रकाशचंद्र पोरवाल यांच्याकडून २५ ऑक्टोंबर २०२४ रोजी ४९७ ग्रॅम तर ४ नोव्हेंबर २०२४ रोजी ८११ ग्रॅम असे १३०९ ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने घेतले होते. त्यानंतर त्याने राज गोल्डचे मालक व ज्वेलर्स व्यापारी भैरुलाल फुटरमल जैन यांच्याकडून १६ नोव्हेंबर ४०० ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने दागिने बनविण्यासाठी घेतले होते. मात्र या दोघांनाही त्याने दागिने बनवून दिले होते. या तिघांकडून त्याने ३ कोटी ७६ लाख रुपयांचे ४ हजार ६४४ ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने घेतले आणि त्यांना दागिने बनवून न देता या सोन्याचा परस्पर अपहार करुन तिन्ही ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच या तिघांनी एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती.
दुसर्या घटनेत दोन ज्वेलर्स व्यापार्यांनी त्यांच्या परिचित ज्वेलर्स व्यापार्याची २ कोटी २२ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केल्याचे उघडकीस आले. माणक शांतीलाल जैन हे घाटकोपर येथे राहत असून त्यांची काळबादेवी येथे एक खाजगी कंपनीत आहे. याच कंपनीत त्यांच्यासह त्यांची पत्नी तारा जैन हे दोघेही संचालक म्हणून काम करतात. हेमंदर जैन हा ज्वेलर्स व्यापारी असून ते दोघेही एकमेकांच्या गेल्या २४ वर्षांपासून परिचित आहेत. दोन वर्षांपूर्वी तेजस सोनी आणि हेमंदर जैन यांनी स्वतची सोन्याचे दागिने बनविण्याची एक कंपनी सुरु केली होती. ते दोघेही त्यांच्या परिचित असल्याने त्यांनी त्यांना जून महिन्यांत त्यांनी त्यांना सुमारे दोन कोटी बावीस लाख रुपयांचे सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दोन किलो वजनाचे सोन्याचे बार आणि आणि एक किलो ६५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सॉल्ड्रिंगसाठी आणि दुरुस्तीसाठी दिले होते. मात्र या दोघांनी दिलेल्या मुदतीत त्यांना दागिने परत न करता त्याचा परस्पर अपहार करुन माणक जैन यांची फसवणुक केली होती.
तिसर्या घटनेतील तक्रारदार उज्जल निताई धोराई यांचा काळबादेवी येथे सोन्याचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे. ते विविध ज्वेलर्स व्यापार्याकडून शुद्ध सोने घेऊन त्यांना दागिने बनवून देतात. काही महिन्यांपूर्वी त्यांना संजय जैन यांनी दागिने बनविण्याची ऑर्डर दिली होती. ही ऑर्डर पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांनी त्यांचा कारागिर संजय सामंताकडे सोपविली होती. ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांनी त्याला २६ लाखांचे ३०० ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने दागिने बनविण्यासाठी दिले होते. दागिने न बनविता संजय हा शुद्ध सोने घेऊन कारखान्यातून पळून गेला होता. हा प्रकार नंतर लक्षात येताच त्यांनी त्याला सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा संपर्क होऊ शकला नाही. त्याने त्याचा मोबाईल बंद केला होता. संजय हा पळून गेल्याची आणि परत येणार नसल्याची खात्री होताच त्यांनी त्याच्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तिन्ही घटनेनंतर एल. टी मार्ग पोलिसांनी तीन ज्वेलर्स व्यापार्यासह एका कारागिराविरुद्ध तीन स्वतंत्र अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. चारही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.