पावणेचार कोटीचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिराचे पलायन
झव्हेरी बाजार येथील घटना; कारागिराविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ जून २०२४
मुंबई, – पावणेचार कोटी रुपयांच्या सोन्याचे दागिने घेऊन एका कारागिराने पलायन केल्याची धक्कादायक घटना झव्हेरी बाजार परिसरात उघडकीस आली आहे. यादव चंद्रपाल असे या कारागिराचे नाव असून त्याच्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. दागिने बनविण्यासाठी, दुरुस्तीसाठी तसेच पॉलिश करण्यासाठी दिलेल्या दागिन्यांचा अपहार करुन यादव चंद्रपालने सात ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
केसरसिंह मोडासिंह खरवड हे मालाड परिसरात राहत असून व्यवसायाने सोन्याचे व्यापारी आहेत. त्यांचा सोन्याचे दागिने खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. यादव चंद्रपाल हा त्यांचा परिचित कारागिर असून अनेकदा ते त्याच्याकडून सोन्याचे दागिने बनवून घेत होते. यादवचा झव्हेरी बाजार येथील मांडवी, मिर्झा स्ट्रिट, जैनाब हाऊसमध्ये सोन्याचे दागिने बनविण्याचा एक कारखाना आहे. कामात हुशार असल्याने यादवकडे त्यांच्यासह त्यांचे परिचित ज्वेलर्स व्यापारी दागिने बनविण्यासाठी देत होते. ६ फेब्रुवारी ते १८ एप्रिल २०२४ या कालावधीत त्यांच्यासह त्यांचे ज्वेलर्स व्यापारी मित्र निलेश कांतीलाल जैन, संकेत सुशील डांगी, विकेश चंपालाल जैन, पियुष सोनी, जिनेश पारेख, निलेश कांतीलाल जैन अशा सातजणांनी यादव चंद्रपालला पावणेचार कोटीचे ५ किलो १९२ ग्रॅम वजनाचे सोने दागिने बनविण्यासाठी, दुरुस्तीसाठी तसेच पॉलिश करण्यासाठी दिले होते.
मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना दागिने परत केले नाही. वारंवार विचारणा करुन तो त्यांना टाळण्याच प्रयत्न करत होता. अलीकडेच त्यांना यादव चंद्रपाल हा पावणेचार कोटीचे दागिने घेऊन पळून गेल्याचे समजले होते. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी त्याच्या झव्हेरी बाजार येथील कारखान्यात जाऊन पाहणी केली होती. यावेळी त्यांना यादव हा पळून गेल्याचे समजले. या घटनेनंतर त्यांच्यासह इतर सहा ज्वेलर्स व्यापार्यांनी एल. टी मार्ग पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर यादव चंद्रपाल याच्याविरुद्ध पावणेचार कोटीच्या दागिन्यांचा अपहार करुन सात ज्वेलर्स व्यापार्यांची फसवणुक केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या कारागिराचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही व्यापार्यांचे दागिने पळवून नेले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.