4.89 कोटीच्या दागिन्यांचा अपहार करुन दोन व्यापार्यांची फसवणुक
व्यापार्यासह दोघांविरुद्ध दोन स्वतंत्र अपहारासह फसवणुकीचा गुन्हा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – क्रेडिटसह सोन्याचे दागिने बनविण्यासाठी घेतलेल्या 4 कोटी 89 लाख रुपयांच्या सोन्याचा अपहार करुन दोन ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक झाल्याचा प्रकार झव्हेरी बाजार परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सुरेश जिवराज रावल आणि हसन शेख या दोघांविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी दोन स्वतंत्र अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यातील सुरेश रावल हा ज्वेलर्स व्यापारी तर हसन शेखचा सोन्याचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे. तिथेच तो वेगवेगळ्या ज्वेलर्स व्यापार्यासाठी सोन्याचे दागिने बनविण्याचे काम करतो. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच दोन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
चेतन मदनलाल पारेख हे लालबाग परिसरात राहत असून ते ज्वेलर्स व्यापारी आहेत. झव्हेरी बाजार परिसरात त्यांचा सोन्याचे दागिने खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. सुरेश रावल हा त्यांच्या गेल्या दहा वर्षांच्या परिचित ज्वेलर्स व्यापारी आहे. त्याचा रौनक ज्वेलर्स नावाचे एक दुकान आहे. नोव्हेंबर 2024 रोजी त्याने त्यांच्याकडून चार कोटीचे सोन्याचे दागिने बनवून घेतले होते, या दागिन्यांचे पेमेंट वेळेवर करुन त्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला होता. मार्च 2025 रोजी सुरेश रावल हा पुन्हा त्यांच्या दुकानात आलाद होता. त्याने त्यांच्याकडून वेगवेगळ्या डिझाईनचे चार कोटी आठ लाखांचे 4 किलो 299 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बनवून क्रेडिटवर घेतले होते. सात दिवसांत पेमेंट करण्याचे आश्वासन देऊन सुरेश रावल हा तेथून निघून गेला होता.
मात्र दिलेल्या मुदतीत सोन्याचे दागिन्यांचे पेमेंट केले नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे विचारणा सुरु केली होती. यावेळी त्याने लवकरच पेमेंट करतो असे सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला होता. सुरेशकडून पेमेंट मिळत नसल्याने त्यांनी त्याच्याकडून क्रेडिटवर घेतलेल्या दागिन्यांची मागणी केली होती, मात्र त्याने दागिने परत केले नाही. याबाबत पुन्हा विचारणा केल्यानतर त्याने त्यांना पैसे किंवा दागिने परत करणार नाही असे सांगून पैशांसाठी दबाव आणला तर आत्महत्या करुन त्यांच्यावर केस करण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर तक्रारदार प्रचंड घाबरले होते. त्यामुळे त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांत धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून सुरेश रावलविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
दुसर्या घटनेत एका कारागिराने ज्वेलर्स व्यापार्याकडील सुमारे 81 लाखांचे सोने घेऊन पलायन केल्याची घटना झव्हेरी बाजार परिसरात उघडकीस आली आहे. हसन शेख असे या कारागिराचे नाव असून त्याला सोन्याचे दागिने बनविण्यासाठी तक्रारदार व्यापार्याने 81 लाख 66 हजार रुपयांचे 605 ग्रॅम वजनाचे सोने दागिने बनविण्यासाठी दिले होते. मात्र दागिने न बनविता हसन शेख हा पळून गेला होता. रौनक ज्ञानमल साखला हे अंधेरीतील मरोळ परिसरात राहतात. त्यांच्या मालकीचे झव्हेरी बाजार परिसरात सुहान गोल्ड नावाचे एक सोन्याचे दागिने खरेदी-विक्रीचा शॉप आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी हसनशी ओळख झाली होती. हसन हा सोन्याचे दागिने बनविणारा उत्तम कारागिर असल्याने त्यांनी त्याला अनेकदा सोन्याचे दागिने बनविण्यास दिले होते. त्यांच्यासाठी त्यानेही अनेकदा दिलेल्या मुदतीत दागिने बनवून दिले होते. त्यामुळे त्यांचा त्याच्यावर प्रचंड विश्वास होता. त्यातून त्यांच्यात व्यावसायिक संबंध निर्माण झाले होते.
ऑक्टोंबर महिन्यांत त्यांनी त्याला 81 लाख 66 हजार रुपयांचे 605 ग्रॅम वजनाचे सोने दागिने बनविण्यासाठी दिले होते. यावेळी त्याने चार दिवसांत सोन्याचे दागिने बनविण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्याने त्यांना दागिने बनवून दिले नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्या दुकानात जाऊन चौकशी केली असता हसन हा दुकान बंद करुन निघून गेल्याचे दिसून आले. त्याच्याकडे काम करणार्या कारागिराकडे विचारणा केल्यानंतर तो काही दिवसांपासून कारखान्यात येत नव्हता. त्याचा मोबाईल बंद होता. हसन शेख हा त्यांच्याकडील 81 लाख 66 हजार रुपयांचे सोने दागिने न बनविता पळून गेला होता.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून हसनविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांकडून गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेचे पोलिसांना दिले आहे. या आदेशानंतर पळून गेलेल्या दोन्ही आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.