आरे कॉलनीतील बंगल्यात घरफोडी करणार्या पिता-पूत्राला अटक
आरोपींकडून 47 लाख 65 हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – गोरेगाव येथील आरे कॉलनी, रॉयल पाम्स परिसरातील असलेल्या बंगल्यात झालेल्या घरफोडीचा आरे पोलिसांनी अवघ्या बारा तासांत पर्दाफाश करुन या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या पिता-पूत्रांना अटक केली. नियामतुल्ला आयुब खान ऊर्फ जुली आणि शाहिद नियामतुल्ला खान अशी या पिता-पूत्रांची नावे असून ते दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. या दोघांकडून पोलिसांनी 47 लाख 65 हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटकेनंतर दोन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हा दाखल होताच अवघ्या बारा तासांत दोन्ही आरोपींना चोरीच्या मुद्देमालासह अटक करणार्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील व त्यांच्या पोलीस पथकाचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले आहे.
59 वर्षांचे गंगाराजम गंगाराम वुटनुरी हे एका व्यावसायिकाच्या गोरेगाव येथील आरे कॉलनीतील मयुरनगर, रॉयल पाम्स इस्टेट परिसरात असलेल्या बंगल्यात सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. 18 ऑक्टोंबरला रात्री अकरा ते 19 ऑक्टोंबर सकाळी आठच्या सुमारास या बंगल्यातील हॉलची काच तोडून काही अज्ञात चोरट्याने प्रवेश केला होता. त्यानंतर या चोरट्याने बंगल्यातील विविध सोन्या-चांदीचे दागिने, तांबे, पितळाच्या वाट्या, मूर्ती असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते.
रविवारी 19 ऑक्टोंबरला हा प्रकार व्यावसायिकाला निदर्शनास येताच त्यांनी आरे पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्यासह आरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. प्राथमिक तपासात व्यावसायिकाच्या बंगल्यातून सुमारे 36 लाखांचा मुद्देमाल चोरी झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे व्यावसायिकाच्या सुरक्षारक्षकाच्या तक्रारीवरुन आरे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. या घरफोडीची अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त महेश चिमटे यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांना तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त विजय भिसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंगेश अंधारे, पोलीस उपनिरीक्षक सचिन पांचाळ, पोलीस हवालदार नागरे, गणेश पाटील, पोलीस नाईक महाले, पोलीस शिपाई बरकडे यांनी तपास सुरु केला होता. जवळपास 35 हून अधिक सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना या पथकाने दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यांची नावे नियामतुल्ला खान आणि शाहिद असल्याचे उघडकीस आले. ते दोघेही पिता-पूत्रा असून दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यांनीच ही घरफोडी केल्याची कबुली देताना चोरीचा सर्व मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला. या दोघांकडून पोलिसांनी 47 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा संपूर्ण मुद्देमाल त्यांनी व्यावसायिकाच्या घरातून चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
